मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळताना शासन अडचणीत सापडल्याचे बोलले जात असताना, वरिष्ठ नेतेमंडळींनी घेतलेली ही बैठक भविष्यातील धोरण आखणीसाठी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे सरकारवर ताण वाढत चालला असून या पार्श्वभूमीवर विखे –दानवेंची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे. पुढील काही तासात जरांगे यांचा ताफा नगर जिल्ह्यातील विविध भागातून प्रवास करत आळेफाटा येथे जाणार आहे. पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दानवेंच्या भेटीनंतर विखेंची प्रतिक्रिया
रावसाहेब दानवे यांच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “मनोज जरांगे पाटलांबरोबर चर्चा करण्याचा विषयच नाही. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यांनी भेटण्याची आणि चर्चेची भूमिका मांडली तर आम्ही नक्की विचार करू. शिंदे समितीला पूर्ण अभ्यास करण्यासाठी कालावधी दिला पाहिजे. हीच जरांगेंना विनंती आहे. रावसाहेब दानवे हे व्यक्तिगत कामासाठी आले आणि वैयक्तिक भेट झाली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर चर्चा झाली नाही”, असं स्पष्टीकरण विखे पाटलांनी दिलं.
रावसाहेब दानवे काय म्हणाले?
“लोकशाहीत सर्वांना आंदोलनाचा अधिकार आहे. मात्र आंदोलन करताना इतरांना त्रास होवू नये, शांततेत आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आंदोलन करावे. आरक्षण मिळावे यासाठी आमचा आणि सरकारचा पाठिंबा आहे. फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले होते. राज्यात सत्तांतरानंतर मविआने सुप्रीम कोर्टात आरक्षण घालवले. आता नव्याने आरक्षणाची मागणी होतेय. सरकार काही मुद्द्यांवर अभ्यास करतंय. शिंदे समितीची नियुक्ती झालीय, त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. शिंदे समितीच्या अहवालाची वाट बघितली पाहिजे. कुणी एक माणूस हे विषय ठरवू शकत नाही. समितीच्या शिफारशीवर पुढील कारवाई होईल”, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली.
