Nanded News : नांदेड जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेत, चोरीच्या संशयावरून दोन व्यक्तींवर जादूटोणा करण्यात आला. याप्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात भोंदूबाबासह चौघांचा समावेश आहे. या अघोरी कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, बिलोली तालुक्यातील केरूर गावात रामा नारायण आरोटे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. मागच्या महिन्यातील १९ जुलैला त्यांच्या निवासस्थानी चोरी झाली होती. गावातील परमेश्वर राठोड यांच्यावर संशय होता. चोराचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी त्याला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रामा आरोटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल न करता धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथील गंगाराम संका कादरी या मांत्रिकाकडे गेले.
मांत्रिकाने मात्र अघोरी प्रकार केला. तांदूळ टाकलेले नागेलीचे पानाचे विडे रामा आरोटे यांच्याकडे देत त्यांना तुमच्या घरात चोरी केल्याचा ज्याच्यावर संशय आहे, त्यांना थंडगार पाण्यात बुडवून हा विडे खाण्यास द्या, असे सांगितले. त्यानुसार रामा आरोटे यांनी ११ ऑगस्टला ते पानाचे विडे गावातील परमेश्वर कंठीराम राठोड यांना व आणखी एकास (साक्षीदार) खाण्यास दिले. यावेळी विडा खाल्ल्याने परमेश्वर यांच्या शरीराला व मनाला वेदना झाल्या.
विडा खाऊ घातल्याचा व्हिडिओ एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. परमेश्वर कांतीराम राठोड यांनी याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन रामतीर्थ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधक कायद्याप्रमाणे मांत्रीक गंगाराम संका कादरी (राहणार जारिकोट) यांच्यासह रामा नारायण आरोटे (वय 55), गंगाधर रामा आरोटे (वय 30), राजू नारायण आरोटे (वय 40 राहणार केरूर) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार काळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने बिलोली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

