• Wed. Mar 11th, 2026
    राज्यात पुन्हा धुवाधार! पुढील पाच दिवस अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी, काय सांगतो IMD चा अंदाज?

    Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्यभर पावसाने सध्या उसंत घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पण आता पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचा हवामान विभागाने सूचित केले आहे. हवामान विभागाने आता पुढील पाच दिवसांसाठी अनेक जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी केला आहे. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे.

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने परिणामी महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भातही १३ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित जिह्यांत आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    पुढील चार दिवस पावसाची स्थिती कायम राहणार आहे. कोकणातही बहुतांश ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यासह पुण्यात सातारा, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्येही यलो अलर्ट असणार आहे. तर मराठवाड्यात लातूर धाराशिव, बीडमध्येही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    विदर्भात उद्यापासून तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. तर १६ ऑगस्टला मात्र विदर्भातील स्थिती सामान्य असणार आहे. तर पुढील दोन दिवस विदर्भातील काही भाग वगळता हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. मात्र १५ ऑगस्टला कोकणातील रत्नागिरीत तर पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात मुसळधार पाऊस असणार आहे. ज्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    मुंबईसह कोकणात १५ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस होईस, पण १६ ऑगस्टला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे साताऱ्यात तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावतीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा