महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
हा उड्डाणपूल रेडिसन हॉटेलपासून रुस्तमजी ओझोन परिसरापर्यंत पसरलेला असून, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांसाठी महत्त्वाचा दुवा ठरला आहे. मात्र, सागरी मार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने पुलाचे पाडकाम अनिवार्य असल्याचे महापालिकेच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सागरी मार्गात अडथळा ठरल्याने २७ कोटी पाण्यात जाणार असल्याने रोष व्यक्त होत आहे.
महापालिकेने काही पर्यायांचा विचारही केला होता, मात्र कोणताही उपाय प्रभावी ठरत नसल्याने पुलाचा त्याग करावा लागणार आहे. या जागेवर सागरी मार्ग प्रकल्पांतर्गत एक डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे, या नव्या पुलाचा वरचा स्तर माइंडस्पेस ते दिंडोशी कोर्टापर्यंत जाणार असून, खालचा भाग सध्याच्या वीर सावरकर पुलाच्या जागेवर उभारण्यात येईल. हा अंतिम प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.
सागरी किनारा मार्ग-२ अंतर्गत हा प्रकल्प येतो. माइंडस्पेसपासून दिंडोशी कोर्टपर्यंत जातानाच, हा मार्ग गोरेगाव-मुलुंड लिंक रोडलाही जोडला जाणार आहे. या योजने अंतर्गत पश्चिम किनारी मार्गाला पूर्व उपनगराला जोडणे हा उद्देशही आहे. यासंदर्भात स्थानिक भाजप माजी नगरसेवक दीपक ठाकूर यांनी, सावरकर उड्डाणपूल हा गोरेगाव पट्टधात महत्त्वाचा पूल आहे. येथील जंक्शन ओलांडण्यासाठी पूर्वी पाऊण ते एक तास लागत होता. त्यामुळे हा पूल पाडला, तर वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा पर्याय काय, असाही प्रश्न असल्याचे सांगितले.
सागरी किनारा प्रकल्प-२ काय आहे?
मुंबई सागरी किनारा मार्ग २ वर्सोवा ते दहिसर लिंक रोड (व्हीडीएलआर) २२ किमीचा संरेखन आहे. या प्रकल्पात रस्ता, डाणपूल, केबल स्टेड पूल आणि खाडीखाली कट-अँड-कव्हर बोगदा समाविष्ट आहे.
कांदळवन बाधित होणार
वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्ग केला जाणार आहे. यातील महत्त्वाच्या असलेल्त्या ‘मनुव्ह फॉरेस्ट डाइव्हर्जन प्रपोजल’ केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व वातावरणीय बदल मंत्रालयाकडून तत्त्वतः मान्यता प्राप्त झाली आहे. सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआर झेड) मंजुरी, तसेच वन हस्तांतरण प्रस्तावस तत्त्वतः मान्यता प्राप्त झाल्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीस अंतिम मान्यता मिळवण्यासाठी मुंबई महापालिका उच्च न्यायालयाकडे अर्ज करणार आहे. या प्रकल्पात कांदळवनातील ४५ हजार झाडे प्रभावित होणार आहे.
