अखेर कोल्हापूरकरांच्या प्रतिकारासमोर वनताराला झुकावं लागलं आहे. कोल्हापुरांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठात पाठवण्यास वनताराने सहमती दर्शवली आहे.
कोल्हापूरकरांच्या रोषानंतर वनताराकडून कोल्हापूरच्या नागरिकांची माफी देखील मागण्यात आली होती. विशेष म्हणजे कोल्हापूरकरांची माफी मागितल्यानंतर वनतराची टीम आज पुन्हा कोल्हापुरात दाखल झाली. वनताराची टीम, सीईओं यांची दुसऱ्यांदा कोल्हापुरात चर्चा झाली. कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंग इथे नांदणी मठाचे मठाधिपती, लोकप्रतिनिधी आणि वनताराच्या साईओंची चर्चा झाली. या बैठकीला नांदणी मठाचे मठाधिपती, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीच्या ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना मज्जाव करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव जैन बोर्डिंग परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही बैठक संपल्यानंतर नांदणी मठाचे मठाधिपती आणि वनताराचे सीईओ यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.
वनताराचे अधिकारी काय म्हणाले?
“नांदणी मठ, वनतारा आणि महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पीटीशन दाखल करु. आम्ही नांदणी मठात महाराणीसाठी चांगलं घर बनवू, तिची चांगली व्यवस्था करु आणि इथे घेऊन येऊ, अशी बाजू कोर्टात मांडू. त्यामुळे त्याचा निकाल सकारात्मक येईल, ही आमची आशा आहे. अनंत अंबानी यांनी निर्णय घेतला आहे की, त्यांना कोल्हापूरकरांना दु:ख द्यायचं नाही. सर्व कोल्हापूरकारांच्या माधुरीची आपण चांगल्याप्रकारे तिची काळजी घ्यावी, अशी त्यांची इच्छा होती. पण कोल्हापूरकरांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर माधुरी कोल्हापुरात लवकरात लवकर कोल्हापुरात यावी. यामध्ये हत्तीचा विजय आहे. आम्ही सर्वांना सांगू की, जी व्यवस्था वनतारामध्ये आहे ती कोल्हापुरात करु. आम्हाला कुणाला दुखवायचं नव्हतं”, अशी प्रतिक्रिया वनताराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून नांदणी मठाची महाराणी उर्फ माधुरी हत्तीणी ही चर्चेचा विषय बनली होती. नांदणी मठातील महाराणी हत्तीणीच्या विषयी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. वन्य प्राण्यांचा नियमांचा विचार करुन काही गोष्टी सुप्रीम कोर्टात मांडण्यात आल्या होत्या. तसेच महाराणी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात सुप्रीम कोर्टाने अनुमती दिली होती. त्यानुसार वनताराकडून महाराणी हत्तीणीला नेण्यात आलं होतं. मराहाणी ज्या दिवशी नांदणी मठ सोडून गेली त्यादिवशी तिच्यादेखील डोळ्यांत पाणी होतं. तसेच या हत्तीणीसोबत कोल्हापूरकरांच्या भावना आहेत. यामुळे महादेवीच्या निरोपाच्या दिवशी काही जण आक्रमक झाले होते. काहींनी पोलिसांच्या गाडीच्या काचा फोडल्याची घटना समोर आली होती.

