Anil Deshmukh Statement on Raj-Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंमध्ये वाढत्या भेटीगाठींमुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची शक्यता वर्तवली जात आहे. यातच, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी लवकरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होणार असल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडी मुंबई महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याचे देखील भाष्य केले आहे.
अनिल देशमुखांनी निवडणुकीच्या तोंडावर युतीचे भाष्य केले आहे, त्यामुळे राजकारण काय वळण घेणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे रायगड येथे महाविकास आघाडीच्या मंचावर पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (सपा), यूबीटी आणि इतर पक्षांचे नेते रायगडमधील शेकापच्या मेळाव्याला उपस्थित होते.
Raj Thackeray : आम्ही दोघं भाऊ 20 वर्षांनी एकत्र, तुम्ही का वाद घालता? राज ठाकरेंचा ‘मनसे’ सवाल; जे पक्षापासून दुरावलेत…
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांची राज ठाकरेंच्या मनसेशी जवळीक वाढल्याने देशमुख यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, या आठवड्यात दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत. अशातच राज ठाकरे यांचे इंडिया आघाडीशी सूत जुळणार की, केवळ ठाकरे गटाशी युती करुन स्थानिक निवडणूका लढवणार अशा शक्यतांवर चर्चा होऊ शकते. देशमुख याआधीही म्हणाले होते की, ठाकरे बंधू महापालिका निवडणुका जिंकतील. आगामी निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू नवा फॉर्म्युला बनवून निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशमुखांच्या दाव्याला बळ मिळणार आहे.
दरम्यान राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी फारकत घेतली. राज ठाकरे त्यांच्या मुलाचा माहीममधून पराभव झाल्यानंतर आणि एकही जागा न जिंकल्यानंतर भाऊ उद्धव ठाकरे यांच्या जवळ आले. मराठी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या नावाखाली दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.

