CM Last Warning to Ministers : वादग्रस्त विधानं आणि त्यांची वादग्रस्त कृती खपवून घेतली जाणार नाही, सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तुम्हाला अखेरची संधी अन्यथा गंभीर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशाराही फडणवीसांनी दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे; तसेच गृह राज्यमंत्री योगेश कदम वादग्रस्त ठरले. चित्रफितींमुळे वादात अडकलेले शिरसाट आणि कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने लावून धरली होती. त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. बैठकीच्या अजेंड्यावरील विषय संपल्यानंतर मुख्य सचिवांसह सर्व अधिकाऱ्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले.
त्यानंतर थेट विषयाला हात घालण्यात आला. सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्र्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. मंत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपली वर्तणूक चांगली ठेवावी. राज्य सरकार चांगले काम करत असून, मंत्र्यांच्या विधानाने त्यावर पाणी फेरता कामा नये, याची स्पष्ट जाणीव शिंदे आणि पवार यांनी करून दिली.
त्यानंतर फडणवीस यांनी सरकारला अडचणीत आणणाऱ्या मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. ‘मंत्र्यांच्या उलटसुलट विधानांचा थेट परिणाम सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याने मंत्र्यांनी सांभाळून बोलावे. जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटेल, अशी विधाने कटाक्षाने टाळावीत. येथून पुढे सरकारला अडचण निर्माण करणारी कृती मंत्र्यांकडून झाल्यास मला त्याचा गंभीर विचार करावा लागेल. यापूर्वी आपण सगळ्यांनीच शपथ घेतली आहे. शपथ घेऊनही तुम्हाला लाज कशी वाटत नाही,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.
माणिकराव कोकाटे यांना समज
विधिमंडळ अधिवेशनात भर सभागृहात मोबाइलवर रमी खेळतानाची चित्रफीत समाज माध्यमात व्हायरल झाल्याने अडचणीत सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अजित पवार यांनी कडक शब्दांत समज दिल्याचे समजते. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी कोकाटे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन चूक मान्य केली; तसेच भविष्यात अशी चूक होणार नसल्याची हमी दिली. यापुढे तुमची कुठलीही चूक पाठीशी घातली जाणार नाही, असे पवार यांनी कोकाटे यांना खडसावल्याचे समजते.

