Eknath Khadse on Pune Rave Party Case : पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या कारवाईत अंमली पदार्थ देखील सापडली आहेत. या कारवाईनंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
एकनाथ खडसे काय म्हणाले?
“गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरु आहे, त्या वातावरणानुसार, असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की, असं होऊ शकतं. पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये आहेत आणि ते आता अंतिम टप्प्यांमध्ये आहेत. मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही. पण आता अलिकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडल्या, असं सांगितलं जातं ते मी तुमच्या चॅनलमध्ये पाहिलं. माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं झालं नाही. कारण ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.”माझं या निमित्ताने म्हणणं आहे की, ती खरी रेव्ह पार्टी असेल, त्या रेव्ह पार्टीमध्ये आमचे जावई गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणाने तपास करावा अशी अपेक्षा आहे. कारण पोलीस काहीही करु शकतात, अशी भावना जनमाणसात आहे. त्या संदर्भात नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट यायला पाहिजेत. ब्लड रिपोर्ट आला पाहिजे. इतर रिपोर्ट यायला पाहिजेत. सर्व रिपोर्ट आल्यावर त्यावर अधिक भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाष्य करणं चुकीचं होईल. त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईन”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
“सध्या वृत्त वाहिन्यांवर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत ते बघता, हे प्रकरण कशा रितीने घडवलं जात आहे किंवा घडत आहे. पण तथ्य समोर येईल. यामध्ये जावई असेल किंवा कोणीही असो. दोषी असेल तर शासन झालं पाहिजे. पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. त्याचा निश्चितपणे विरोध केला जाईल”, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. “मी पुढे पत्रकार परिषदेतून डिटेल्स देणार आहे. जनतेच्या ज्या भानना आहेत त्या तुम्ही मीडियाद्वारे ऐकता. मला यावर जास्त बोलायचं नाही”, असंदेखील खडसेंनी सांगितलं.

