Satara News : आपण आत्ताच पुण्याला पळून जायचं. माझ्याबरोबर चल नाहीतर तुझा खून करेन, अशी धमकी देत एकतर्फी प्रेमातून तरुणाकडून शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
साताऱ्यातील एका इमारतीच्या परिसरात भरदिवसा महाविद्यालयीन तरूणाने एका शाळकरी मुलीच्या गळ्याला चाकू लावल्याने मोठी खळबळ उडाली. माझ्याबरोबर आत्ताच पुण्याला चल, नाहीतर खून करेन, अशी धमकी तो तरूण मुलीला देत होता. घटनास्थळी जमलेले लोक तसेच संबंधित शाळकरी मुलगी सुद्धा त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तो प्रेमवीर कुणाचेच ऐकत नव्हता.
Nalasopara Crime: भाऊ बेपत्ता, भावजयचाही पत्ता नाही; घरातील टाइल्सचा रंग वेगळा दिसला, खोदताच भयंकर घटनेचा उलगडा
हा थरार सुरू असतानाच शाहूपुरी पोलीस साध्या वेशात घटनास्थळी पोहचले. काही जणांनी त्या तरूणाचे लक्ष वळवले. त्याचवेळी मागच्या कंपाउंडवरून येत एका तरुणाने त्या प्रेमवीराला पकडले. जमावातील लोकांनी त्याच्यावर झडप घालून हातातून चाकू काढून घेतला. तसेच चिडलेल्या नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
संबंधित शाळकरी मुलगी साताऱ्यातील नामांकित शाळेत दहावीत शिकत आहे, तर तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा आर्यन वाघमळे हा बारावीत आहे. लहानपणापासून ते एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांची ओळख होती. वडिलांच्या निधनानंतर डिसेंबर २०२४ मध्ये तो मामाकडे राहायला गेला होता. या आधीही त्याने असाच प्रकार केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली असून पालकांची चिंता वाढली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर करत आहेत.

