शेतकरी व नागरिकांना विनाखंड वीज उपलब्ध करून देण्याच्या दिल्या सूचना
अमरावती, दि. २१ (जिमाका): जिल्ह्यात दोन टप्प्यात ८६ हजार ४४७ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर झाली आहे. त्यातील मयत व अन्य कारणांमुळे केवायसी राहिलेल्या जवळपास 18 हजार शेतकऱ्यांची एक महिन्यात केवायसी पूर्ण करावी. यासाठी स्थानिक आमदारांची मदत घेऊन याद्या तयार करा अशा सूचना करत शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंत्रणांना दिल्या. तसेच, जिल्ह्यात शेती व सार्वजनिक उपयोगासाठी वीज अखंड उपलब्ध होण्याकरिता महावितरण कंपनीने तातडीने यंत्रणा सुधार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नियोजन भवनात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्ज माफी व पीक कर्ज संदर्भात अग्रणी बँकांची आणि महावितरणची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर झाली आहे. यासंदर्भात याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र यातील काही शेतकऱ्यांना मालक शेतकरी मयत झाल्याने व अन्य तांत्रिक कारणांमुळे केवायसी झाली नसल्याने कर्जमाफी झाली नसल्याचा विषय तातडीने सोडविण्याच्या सूचना श्री. बावनकुळे यांनी यावेळी केल्या. यासाठी तातडीने जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ निहाय केवायसी मुळे लाभला मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून तलाठ्यांच्या माध्यमातून त्यांना नोटीस देण्यात याव्या, स्थानिक आमदारांनी यात स्वतः लक्ष घालून हा विषय प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी समन्वय अनेक कार्य करून महिनाभरात निकाली काढण्याचे निर्देशांनी दिले.
या कामात बँकांनी कुठल्याही पद्धतीने दिरंगाई किंवा कुचराई करता कामा नये. बँकांनी मयत शेतकऱ्यांचा वारस लावून त्यास लाभ देणे गरजेचे आहे. त्याकरिता तहसीलदार यांच्याकडून देण्यात येणारे वारसदाराचे प्रमाणपत्र प्रमाण मानून कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कामात दिरंगाई केल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांवर गुन्हे दाखल करावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात शेती व सार्वजनिक उपयोगात येणारी वीज सतत खंडित होत असल्याच्या तक्रारी पाहता उचित यंत्रणा राबवून ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्याचे निर्देश श्री. बावनकुळे यांनी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. ज्या ठिकाणी विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) उभारण्याची गरज आहे तेथे ती उभारावी व त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
यावर्षी पाऊस कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात यावे, त्यासाठी मालगुजारी काळातील गावोगावी बांधण्यात आलेल्या विहिरी पुनर्जीवित कराव्या अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी या संदर्भात आपल्या परिक्षेत्रातील यादी तयार करावी, सिमेंट रस्त्यांची कामे घेऊ नये, जिल्ह्यात जमिनीतील जलस्तर 200 फुटांनी वाढविण्यासाठी सर्व सर्वांनी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपस्थित असलेल्या सर्व तहसीलदारांशी त्या-त्या भागातील प्रश्नांबाबत त्यांनी माहिती जाणून घ्या सूचना दिल्या.
नशा मुक्त अभियानांतर्गत अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वतीने तयार केलेल्या डॉक्युमेंटरीच्या यावेळी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या आढावा बैठकीस खासदार बळवंत वानखडे, आमदार सर्व श्री. प्रवीण तायडे, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रतापदादा अडसड, प्रवीण पोटे, संजय खोडके, सुलभा खोडके, उमेश यावलकर, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले आदी उपस्थित होते.
००००००