• Tue. Sep 22nd, 2026

‘सेवा संकल्प अभियान’ आदिवासी क्रांतिकारकांच्या चरित्र व शौर्यगाथेवर निबंध स्पर्धेचे आयोजन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 22, 2026

सोलापूर, दि. २१ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांच्या वतीने आदिवासी क्रांतिकारकांचे चरित्र व शौर्यगाथेवर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा २१ सप्टेंबर २०२६ रोजी प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय, अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये घेण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार तसेच संबंधित आयुक्तालयाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत म्हणजेच १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘आदिवासी क्रांतिकारकांचे चरित्र व शौर्यगाथा’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या ३ शासकीय, २ अनुदानित आश्रमशाळा व ६ शासकीय वसतिगृहांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचे योगदान, त्यांचे शौर्य, त्याग आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, तसेच त्यांच्या ऐतिहासिक योगदानाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या निबंध स्पर्धेत संबंधित शासकीय, अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी दिली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed