• Wed. Jun 17th, 2026
    मोठी आई रागावली, 10 वर्षीय मुलाने लहान भावासह घर सोडलं, मुंबईला निघाले अन्…

    Nagpur Little Boy Run Away: नागपुरात मोठी आई रागावल्याने एक दहा वर्षांचा मुलगा आपल्या लहान चुलत भावाला घेऊन घरातून निघाला. ते थेट मुंबईला यायला निघाले. तिकडे पोलीस आणि नातेवाइक सगळीकडे त्यांचा शोध घेत होते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    नागपूर: मोठी आई रागावल्याने 10 वर्षीय मुलाने नऊ वर्षाच्या चुलत भावासह नागपुरातून पलायन केले. दोघेही विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जायला निघाले. पोलिसांनी वेळीच शोध घेत मलकापूर येथे दोघांना ताब्यात घेतले. मुले सुखरुप आढळल्याने नातेवाइकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मुलगा मुंबईला राहतो. त्याची आई सुरक्षा रक्षक आहे.

    आईपासून वेगळं झाल्याचं दु:ख, त्यात मावशीचा ओरडा

    दीड महिन्यांपूर्वी दहा वर्षीय चेतन (नाव बदललेले) हा मोठ्या आईकडे (मावशी) आला. त्याला नागपुरात चांगले शिक्षण मिळावे यासाठी आईने त्याला नागपुरातच ठेवले. आईपासून दुरावल्याने तो दु:खी झाला. त्याला नागपुरात करमत नव्हते. त्याला शाळेतही दाखल केले. दरम्यान, मोठी आई त्याला रागवायची. त्यामुळे त्याने नागपुरातून पलायनचा निर्णय घेतला. शुक्रवारी चेतन व त्याचा नऊ वर्षीय चुलत भाऊ घरासमोर खेळत होते. घरी कोणी नसल्याचे बघून चेतनने भावासह तेथून पळ काढला.
    Pune News: दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या, दोघांचा जागीच अंत, एक महिला जखमी, बारामतीत हळहळ

    एकाचवेळी दोन मुलं बेपत्ता, कुटुंबात खळबळ

    ते आधी मोठा ताजबाग येथे गेले. तेथे थांबले. दरम्यान, एकाचवेळी दोन मुले बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी शोध घेतला. नातेवाइकांनी वाठोडा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्हेशाखा पोलिसांनाही दोघांचा शोध सुरू केला. दरम्यान ताजबाग परिसरात राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघेही रेल्वेस्थानकावर पोहोचले. विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बसले. दोघेही मुंबईला निघाले.

    विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बसून मुंबईच्या दिशेने रवाना

    वाठोडा व गुन्हेशाखा पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली असता दोघे रेल्वेस्थानकावर गेल्याचे आढळले. पोलिसांना दोघेही विदर्भ एक्स्प्रेसनमध्ये बसताना दिसले. पोलिसांनी गाडीची माहिती काढली. गाडी मलकापूर रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी मलकापूर स्थानकावरील लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांनी गाडीत शोध घेतला असता दोघेही आढळले. पोलिसांनी नागपूर पोलिसांना कळविले. दोघांना नागपुरात आणून नातेवाइकांच्या स्वाधीन केले. जर हे दोघे मुंबईत निघून गेले असते तर त्यांचा शोध घेणं फार कठीण झालं असतं. त्यामुळे नातेवाइकांनी पोलिसांचे आभार मानले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा