Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अकरा वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. पाच जणांनी मुलीला गाडीत ओढले. पण सुदैवाने मुलीला घेण्यासाठी आलेल्या कार चालकाने आरडाओरड केल्याने नागरिक जमा झाले. नागरिकांनी पाठलाग केल्यामुळे अपहरणकर्ते घाबरले. त्यांनी मुलीला रस्त्यात सोडून पळ काढला. आरोपींनी त्यांची गाडीदेखील रस्त्यावर सोडून धूम ठोकली. पोलिसांनी त्यांची गाडी जप्त केली आहे.
शहरातील मध्यवस्तीतून गारखेडा परिसरातील नाथप्रांगण येथे खासगी क्लासेसला आलेल्या एका अकरा वर्षाच्या मुलीला एका कारमधून आलेल्या पाच जणांनी अपहरण केले. नागरिकांनी धाव घेतल्याने, अपहरण कर्त्यांची कार अडकल्याने, कार सोडून पळून गेले. ही घटना आज (16 जुलै) रात्री आठ ते साडे आठ वाजेच्या दरम्यान घडली.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथप्रांगण भागात एका क्लासेसमधून अकरा वर्षाची मुलगी ही घराकडे जाण्यासाठी बाहेर पडली. ही मुलगी तिला घेण्यासाठी आलेल्या वाहनाकडे पायी जात असताना, एक सॅन्ट्रो कार ही तिच्यामागून आली. काही समजण्याच्या आतच या कारमध्ये बसलेल्या काही जणांनी तिला कारमध्ये ओढले. सदर मुलीला घेण्यासाठी कार घेऊन आलेल्या कारच्या ड्रायव्हरने ही घटना पाहिली. त्याने आरडाओरड करून काही जणांना मदतीची हाक दिली.
अकरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याचे कळताच, काही युवक आणि नागरीक हे कारच्या मागे धावले. या कारच्या मागे नागरीक लागल्याने, त्याने सदर मुलीला बाहेर सोडून पळ काढला. अपहरणकर्त्यांनी त्यांची कार ही साईनगरच्या मार्गावर टाकली. ही कार काही अंतरावर गेली. त्यानंतर कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्यांची कार सोडून पळ काढला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी काही प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेत, अपहरणकर्त्यांचा शोधासाठी पथके तयार केली आहे. या प्रकरणात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

