Sanjay Rathod : मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड वाशिम जिल्हा दौऱ्यावर होते. वाशिममधील एका कार्यक्रमात बोलताना ते भावूक झाले. समाजाचा विश्वास आणि अपेक्षा पूर्ण करू शकेन की नाही ही भावना मनात आल्याने मी भारावून गेलो. बंजारा समाजाने नेहमीच साथ दिली, असे ते म्हणाले. समाजाच्या एकजुटीमुळे मोठे यश मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले. सध्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
“कोणतेही संकट असो. माझा बंजारा समाज एकजुटीने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. माझ्यावर एवढे संकट आले तेव्हा माझा समाज सोबत होता. माझ्याजागी कोणी दुसरा असता तर त्याने आत्महत्या केली असती”, असेही मंत्री संजय राठोड यांनी भाषणा दरम्यान बोलून दाखवले.
“निवडणुकांवेळी अनेक जण विरोध करतात. मात्र माझा बंजारा बांधव माझ्या पाठीशी असतो. बंजारा समाज एकजूट करण्याचे काम मी करत आहे. समाज एकत्र आला तर मोठ्या प्रमाणात आपल्या समाजाचे आमदार निवडून येऊ शकतात, पर्यायी मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलविण्याचे काम बंजारा समाज करू शकतो,” असंदेखील संजय राठोड यावेळी म्हणाले.
दरम्यान, संजय राठोड यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात गंभीर आरोप झाले होते. एका रिल्सस्टार मुलीने आत्महत्या केल्यानंतर संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. पण त्यावेळी समाज त्यांच्यासोबत उभा होता.
‘चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर…’
“मी चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर गिर्हाईक फिरता फिरेना आणि मी जेव्हा सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो तेव्हा गिऱ्हाईक मावता मावेना. सध्या जे प्रकार राजकारणात सुरू आहे, कोणीही येतो उठसूट बोलतो. माझ्या पाठीमागे समाज उभा राहिल्यामुळे मजबुतीने तुमच्या समोर संजय राठोड काम करताना उभा दिसतोय”, असं संजय राठोड आज माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले.

