• Wed. Mar 11th, 2026

    ‘हे सर्व अतिशय अस्वस्थ करणारं’, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

    ‘हे सर्व अतिशय अस्वस्थ करणारं’, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

    Supriya Sule on Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि अजित पवार यांच्या पक्षाचे युवा नेते सूरच चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण प्रवीण गायकवाड यांच्यावर केवळ शाईफेक करण्यात आली नाही तर त्यांना धक्काबुक्कीदेखील करण्यात आली आहे. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर भूमिका मांडली आहे.

    “महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली. हे सर्व अतिशय अस्वस्थ करणारे असून या घटनेचा निषेध करावा तितका कमीच आहे. हे निषेधार्ह कृत्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी बहुजन समाजासाठी कार्य करणारे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो. या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भाजपचा हल्लेखोर आणि त्यामागील सूत्रधार याला शोधून गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी”, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

    अजित पवारांच्या पक्षाची प्रतिक्रिया काय?

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे युवा नेते सूरच चव्हाण यांनीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आली.घडलेला घटनेचा जाहीर निषेध. हे निषेधार्ह कृत्य करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे”, अशी भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा