मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिरसाट हे अधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी देण्यास टाळाटाळ करण्यास सांगत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. तसेच, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांचा विरोध करण्याचे आवाहन करत मुंबईत अंतिम लढाई लढण्याची तयारी करण्याचे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे.
“तुम्ही तोंडावर एक बोलता आणि पाठीमागे दुसरे बोलता हे योग्य नाही. एवढा वाईट विचार मंत्री संजय शिरसाट करतील हे मला वाटले नव्हते. पण तुमची गाठ मराठ्यांशी आहे”, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी थेट मंत्री संजय शिरसाठ यांना इशाराच दिला आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील धारासुर येथे काल मनोज जरांगे पाटील यांनी अचानक भेट देऊन चावडी सभेत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केले.
मनोज जरांगे काय-काय म्हणाले?
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असा शासन निर्णय काढणार असल्याचे सरकार सांगत होते. पण अद्यापही या सरकारने कशा प्रकारचा शासन आदेश काढला नाही. त्यामुळे स्पष्ट होत आहे की या सरकारला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सहजासहजी द्यायची नाही आणि त्याचबरोबर जात पडताळणी देखील सहजासहजी करायची नाही. सुरुवातीला म्हणाले की जोपर्यंत नोंदी सापडत नाहीत तोपर्यंत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत. आता लाखोंच्या संख्येने कुणबी नोंदी सापडत आहेत. पण जात प्रमाणपत्र द्यायला आता याच सरकारमधले मंत्री विरोध करत आहेत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांचा मराठा समाजाला आवाहन
“तुमच्याकडे 20 एकर जमीन असेल तर त्याच्या बदल्यात एक कुणबी प्रमाणपत्र त्याची बरोबरी करू शकतो. जात प्रमाणपत्र देण्यासाठी जे अधिकारी आणि कर्मचारी विरोध करत आहेत त्यांचा सामूहिक विरोध करा आणि आपल्या बांधवांना जास्तीत जास्त कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत करा”, असे आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
… तर राज्यभरातील कार्यालयांना घेराव घालणार आणि याला जबाबदार मंत्री संजय शिरसाट असणार : जरांगे
“आता येणाऱ्या काळात दररोज 30 जुलैच्या आत प्रत्येक गावात, चावडीत बैठका घ्या आणि मुंबईला जाण्यासंदर्भात स्वयंसेवक तयार करा. त्या स्वयंसेवकाची यादी 30 जुलैला अंतरवाली सराटीत जमा करा. उद्यापासून पारावरची चावडी बैठक घ्या. आता मुंबईला गेल्याशिवाय आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत. त्यासाठी तयारीला लागा. आता मुंबईत अंतिम लढाई लढाईची आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

