• Thu. Jun 18th, 2026
    पद्मसिंह पाटील रुग्णवाहिकेतून कोर्टात, पण पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालासाठी नवी तारीख जाहीर

    Pawanraje Nimbalkar Case Verdict : महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : दोन दशकांपासून न्यायालयीन प्रक्रिया सुरु असलेल्या आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. शनिवार २० जूनला सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून त्यादिवशी अंतिम निकाल लागण्याचे संकेत आहेत. तब्बल २० वर्ष तेरा दिवसाच्या कालावधीत चाललेल्या सुनावण्यांनंतर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालय या बहुचर्चित प्रकरणावर अंतिम निर्णय देणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागलं होतं. मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील निकालासाठी रुग्णवाहिकेतून कोर्टात आले होते. पाटील कुटुंब आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कुटुंब यासाठी कोर्टात आले होते.

    वीस वर्षांपूर्वीचे हत्याकांड

    ३ जून २००६ रोजी धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रभावी नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे असलेला तपास नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
    Maharashtra TimesUddhav Thackeray : उबाठाचे सात खासदार फुटण्याच्या चर्चा, धोका टाळण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन, सहा दिवसांनी काय घडणार?

    राजकीय वैमनस्यातून कटाचा आरोप

    महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या सर्व आरोपी जामिनावर मुक्त आहेत. धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या संघर्षातून आणि वाढत्या राजकीय वैमनस्यातून पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा उल्लेख सीबीआयच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. पवनराजे निंबाळकर यांचा वाढता प्रभाव आणि राजकीय अस्तित्वामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्यांच्या खुनासाठी २५ ते ३५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचं सीबीआयने म्हटलं आहे.

    गर्दीत हात उचलला, दिपकेंची पहिली प्रतिक्रिया; कॉक्रोच पार्टीचा नागपुरात एल्गार

    पारसमल जैन झाला माफीचा साक्षीदार

    पवनराजे निंबाळकर खटल्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणून पारसमल जैन याचे नाव पुढे आले होते. तपास यंत्रणांच्या मते, जैननेच सुपारी स्वीकारुन संपूर्ण कटाची अंमलबजावणी केली होती. जमिनीच्या व्यवहाराच्या बहाण्याने पवनराजे निंबाळकर यांना कळंबोलीला बोलावल्याचा आरोप आहे. त्यानंतर दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी पवनराजे आणि त्यांचे चालक समद काझी यांच्यावर गोळीबार केला. पुढे न्यायालयाने जैनला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता दिली. त्यामुळे त्याची साक्ष सीबीआयच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानली जात आहे.
    Maharashtra TimesSanchita Ugale : संचूss उठ ना बबड्या, मला आई म्हण ना… अभिनेत्री संचिता उगलेला अखेरचा निरोप देताना आईची व्याकुळ अवस्था
    या खटल्याची सुनावणी विशेष सीबीआय कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह तब्बल १२८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. अनेक वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. गृहमंत्री, सिंचन मंत्री आणि ऊर्जा मंत्री यांसारखी महत्त्वाची पदे भूषवलेल्या पद्मसिंह पाटील यांच्यासाठी हा निकाल प्रतिष्ठेचा विषय मानला जातो.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा