• Sat. Mar 14th, 2026

    आता माझं लग्न ठरलंय, तुम्हीही…; कोल्हापुरातील पोलीस युवकाचं पुण्यात धक्कादायक पाऊल

    आता माझं लग्न ठरलंय, तुम्हीही…;  कोल्हापुरातील पोलीस युवकाचं पुण्यात धक्कादायक पाऊल

    Kolhapur News: कोल्हापूरमधील कसबा बावड्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने परिसरात शोक पसरला आहे. स्वरूप विष्णू जाधव (वय २८) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते पुणे पोलीस दलात कार्यरत होते.

    कोल्हापूर (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    कोल्हापूर: कसबा बावडा येथील एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. स्वरूप विष्णू जाधव (वय २८) असे त्यांचे नाव आहे. ते पुणे पोलीस दलात कार्यरत होते. लग्नाची तयारी सुरु असतानाच त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले. त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

    स्वरूप जाधव हे मूळचे कसबा बावड्यातील भगवा चौक, मराठा कॉलनीचे रहिवासी होते. त्यांनी स्वारगेट पोलीस लाईनमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या रूममधील खिडकीला टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेतला. ते 2023 मध्ये पुणे पोलीस दलात भरती झाले होते.

    स्वरूप यांचे लग्न ठरले होते. दिवाळीनंतर ते लग्नाचा बार उडवणार होते. “माझे आता लग्न ठरलेय. रजा शिल्लक पाहिजे. दिवाळीनंतर मी लग्न करणार आहे. तुम्ही पण मुली बघा आणि लग्न करा”, असे ते मित्रांना नेहमी म्हणायचे, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले.

    मोठी बातमी! संजय गायकवाड यांच्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

    स्वरूप यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुणे खडकवासला पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुटुंबातील तरुण पोरानं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. स्वरूप यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी बावडा स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. स्वरूप जाधव यांच्या अंत्यसंस्काराला मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती.

    दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बावडा परिसरात आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महिनाभरात पाच ते सात जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा