• Tue. Jun 9th, 2026

    मावळच्या मंगरूळमधील अवैधरित्या वृक्षतोड व उत्खननप्रकरणी अहवाल सादर करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 10, 2025
    मावळच्या मंगरूळमधील अवैधरित्या वृक्षतोड व उत्खननप्रकरणी अहवाल सादर करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे – महासंवाद




    मुंबई, दि. १० : मावळ तालुक्यातील मंगरूळ मध्ये अवैधरित्या वृक्षतोड व उत्खनन प्रकरणी संबंधित विभागांनी लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

    मावळ मतदारसंघातील मौजे मंगरूळ येथील गट क्रमांक ३५ ते ३८ आणि ४१ ते ४९ या वनक्षेत्र आरक्षित भागात झाडांची अवैध वृक्षतोड करून माती, मुरूम व डबराचे उत्खनन झाल्याची तक्रार आली होती. यासंदर्भात आमदार सुनिल शेळके यांनी मार्च २०२५ च्या विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता.

    त्याअनुषंगाने विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके, मावळ तालुक्याचे उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळ तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणाले की, वनसंवर्धन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब महत्वाची असून या प्रकरणाचा अहवाल तत्काळ द्यावा. तसेच मावळ मतदारसंघातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील जागांवर विकासकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करावी.  मावळ तालुक्यात खासगी कंपन्यांतील सांडपाण्याची विल्हेवाट योग्य मार्गाने होत असल्याचबाबतची खातरजमा करून त्याचा अहवाल सादर करावा.

    मावळ तालुक्यात अलिकडे मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प उभारले जात असून, अनेक बिल्डरनी सदनिका बांधून विक्री केली आहे. मात्र, या गृहप्रकल्पांमधील नागरिकांना बोअरिंगच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागांमध्ये दूषीत पाण्यामुळे पोटदुखी, त्वचेचे आजार व इतर आरोग्यविषयक तक्रारी वाढल्याचे निदर्शनास आले आहे, याबाबतही चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी दिल्या.

    0000

    मोहिनी राणे/ससं/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed