MNS Chief Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्वाचा आदेश दिला आहे. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर, तसेच मीरा भाईंदर येथील आजच्या मोर्चानंतर राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. आपल्या परवानगीशिवाय माध्यमांना प्रतिक्रिया द्यायची नाही, असा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
राज ठाकरे यांनी केवळ आपल्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यालाच नाही तर मोठे नेते, पदाधिकाऱ्यांनादेखील संबंधित आदेश दिला आहे. पक्षाने नेमून दिलेल्या प्रवक्त्यांनी देखील आपल्याला विचारल्याशिवाय किंवा परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही, असा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या नेतेमंडळींना दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणावर कदाचित राज ठाकरे हे स्वत: पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांचा नेमका आदेश काय?
“एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजीटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी देखील कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी काळात आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 8, 2025
दरम्यान, 5 जुलैला नुकतंच वरळी डोम सभागृहात पार पडलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मनसैनिकांना महत्त्वाचा आदेश दिला होता. मराठी भाषा बोलण्यावरुन वाद घालणाऱ्यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ बनवू नका आणि ते कुठे शेअरही करु नका, असा आदेश राज ठाकरे यांनी दिला होता. यानंतर आता राज ठाकरे यांनी आज आपल्या ‘एक्स’ अकाउंटवरुन नव्या सूचना दिल्या आहेत.

