• Sun. Jun 7th, 2026

    आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 5, 2025
    आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा – महासंवाद

    मुंबई, दि. ५ : “आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची सशक्त चळवळ आहे. गेली अनेक शतके पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाला दिशा देण्याचे, समृद्ध करण्याचे काम केले आहे. आजही लाखो वारकरी ‘हरिनामा’च्या गजरात पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या दिशेनं चालताना आपल्या कृतीतून एकतेचा, समतेचा, बंधुत्वाचा संदेश देत आहेत. ही महाराष्ट्राची आध्यात्मिक सांस्कृतिक एकजुटीची ताकद आहे. ती टिकवणे, वाढवणे ही आपली जबाबदारी आहे,” असे  सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आणि माता रुक्मिणीच्या चरणी साष्टांग दंडवत घालत वारकरी बांधवांना, राज्यातील शेतकरी, कष्टकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणतात की, “आषाढीवारीच्या रूपाने महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा, सांस्कृतिक चळवळ जपत, वाढवत पुढे नेत असताना मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकवणे, मराठीचा आवाज आसमंतात दुमदुमत, महाराष्ट्राच्या प्रगतीचा झेंडा सदैव फडकत राहिला पाहिजे, त्यासाठी कष्ट करण्याचे बळ आम्हाला दे. राज्यात यंदाही चांगला पाऊस होवो. शेतकऱ्याच्या शिवारात पिकांची, घरात धनधान्याची सुबत्ता येवो. राज्यातल्या घराघरात सुख, शांती, समाधान, समृद्धी नांदो,” असं साकडंही उपमुख्यमंत्री पवार यांनी पांडुरंगाच्या चरणी घातलं आहे.

    वारीतील शिस्त, स्वच्छता, सेवाभाव, परस्पर सहकार्य, सामाजिक बंधिलकी याबद्दलही उपमुख्यमंत्री पवार यांनी गौरवोद्गार काढत, “वारीनं आपल्याला सामाजिक ऐक्य, समर्पणाची भावना आणि माणुसकीचा खरा अर्थ शिकवला आहे. हीच ऊर्जा आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरली पाहिजे,” असं आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना केलं आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed