Sharad Pawar Press Freedom : सध्या दिल्लीसह देशभरात सत्ताधाऱ्यांची माध्यमांवर करडी नजर आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात काही छापले गेले की, ताबडतोब फोन फिरवले जातात. माध्यमस्वातंत्र्याची अशी गळचेपी होत असल्याचे विधान शरद पवारांनी केले.
आपल्या भाषणात शरद पवार यांनी त्यांच्या ५७ वर्षांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीतील पत्रकारितेतील अनेक स्थित्यंतरांबद्दलची निरीक्षणे नोंदवली. आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आणखी दोघांसोबत केलेला मासिक सुरू करण्याचा निष्फळ प्रयत्न अशा अनेक आठवणी सांगताना पवार यांनी आणीबाणीच्या दिवसांवरही भाष्य केले. ‘आणीबाणीच्या कालखंडात काही वृत्तपत्रांनी सरकारविरोधातील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. अग्रलेखाची जागा मोकळी सोडत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला होता. यथावकाश इंदिरा गांधींनी त्या कालखंडाची, निर्णयाची जाहीर माफी मागितली. लोकांनी त्यांचा पराभव केला. पुढे जनता सरकारच्या काळानंतर पुन्हा लोकांनी इंदिरा गांधी यांना निवडून देत माफ केल्याचेही दाखवून दिले. पण आता ५० वर्षांनी त्या गोष्टी उकरून काढल्या जात आहेत’, असे पवार म्हणाले.
Prithviraj Chavan: ठाकरे बंधु एकत्र आले, तर काँग्रेसची भूमिका काय असेल? पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘सध्या दिल्लीतील केंद्र सरकारच्या काही उच्चपदस्थ नेत्यांकडे दरदिवशी वर्तमानपत्रांमध्ये काय छापून आले, याची बारकाईने चिकित्सा होते. ते सरकारच्या विरोधात असेल, तर संबंधितांना फोन केला जातो. वर्तमानपत्रांचा जाहिरातींचा ओघ कमी होतो. ही माध्यमांची गळचेपी करणाऱ्यांना इंदिरा गांधींवर टीका करण्याचा अधिकार नाही’, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार मिळवलेल्या मधुकर भावे यांनीही आपल्या ६० वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे उलगडून सांगत, सध्या पत्रकारांनी जागल्याची भूमिका घेत सतत व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. पत्रकारिता हा निखारा आहे. तो धगधगता तर ठेवायचाच, पण तसा तो ठेवताना आपला पदर न जळण्याची काळजीही पत्रकारांनी घ्यायची असते, असे ते म्हणाले.
या सोहळ्याला डॉ. नरेंद्र जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर, अभिनेता भरत जाधव यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

