एअर इंडियाच्या घटनेनंतर, इथिओपियन एअरलाईन्सच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानात डिप्रेशरायझेशन झाल्यानं सात प्रवाशांची प्रकृती बिघडली. विमानाने मुंबई विमानतळावर मध्यरात्री इमर्जन्सी लँडिंग केले.
विमानाच्या केबिनमधील हवेचा दाब अचानक कमी झाल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत मिड-एअर डिप्रेशरायझेशन म्हणतात. ही एक तांत्रिक समस्या आहे. केबिन दबाव यंत्रणेत बिघाड झाल्यास ही परिस्थिती उद्भवते. यामुळे विमानातील प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. त्यांना भोवळ येऊ लागते. याशिवाय अन्यही समस्या निर्माण होतात. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
इथोओपियन एअरलाईन्सच्या विमानात ३०० प्रवासी आणि ११ कर्मचारी होते. इथिओपियाची राजधानी अदीस अबाबाहून विमानानं उड्डाण केलं होतं. ते मुंबईत लँड होणार होतं. हे विमान अरबी समुद्रावरुन उडत असताना मिड-एअर डिप्रेशरायझेशनची समस्या निर्माण झाली. फ्लाईटरडार२४ या फ्लाईट ट्र्रॅकिंग वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी विमान ३३ हजार फूट उंचीवर होतं. केबिनमधील हवेचा दाब कमी होताच वैमानिकांनी विमान वेगानं खाली आणलं आणि ते कमी उंचीवरुन उडत राहील याची काळजी घेतली.
विमानातील केबिन प्रेशर अचानक कमी झाल्यानं प्रवासी आणि वैमानिकांना आरोग्याबद्दलच्या अडचणींचा सामना करावा लागला. सात प्रवाशांचा श्वास कोंडला गेला. त्यांना श्वासोच्छवास घेण्यास अडचण येऊ लागली. या प्रवाशांना भोवळ येऊ लागली. यानंतर वैमानिकानं तातडीनं एमर्जन्सी परिस्थिती घोषित केली. सुदैवानं विमान सुखरुपरित्या मुंबईत उतरवण्यात आलं.
प्रकृती बिघडलेल्या सात प्रवाशांना तातडीनं वैद्यकीय मदत देण्यात आली. एका प्रवाशाची तब्येत जास्त बिघडल्यानं त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अन्य ६ प्रवाशांना विमानतळावरच प्रथमोपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली.

