• Fri. Sep 4th, 2026

जगबुडी नदीत कार कोसळून 5 जणाची मृत्यू

ByMH LIVE NEWS

May 19, 2025
जगबुडी नदीत कार कोसळून 5  जणाची मृत्यू

मुंबई – अनुप फंड

सोमवारची सकाळही राज्यासाठी एक वाईट बातमी घेऊन उजाडली. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेड येथे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात झाला.  येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फूट खाली कोसळली. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या कारमधील सर्वजण मुंबईतून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्घटनेत कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालायत उपचार सुरु आहेत.

पुढे आलेल्या माहितीनुसार, पहाटे साधारण पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कार जगबुडी नदीवरुन जात असताना भरधाव वेगात होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती 100 ते 150 फूट खाली कोसळली. कार जोरात खाली आदळल्याने कारचा चेंदामेंदा झाला आहे. ही कार क्रेनच्या साहाय्याने वर उचलण्यात आली. त्यानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले. या भीषण दुर्घटनेत कारचा चालक आणि एक प्रवासी गंभीररित्या जखमी झाला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालायत उपचार सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे.

वाहतूक कोंडी,रुग्णवाहिकाही अडकली 

दुसरीकडे, मुंबईच्या नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्याच्या समोर सोमवारी रात्रीच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या कोंडीत एक रुग्णवाहिका अडकली असून, सायरन वाजवतही तिला मार्ग मिळाला नाही. यामुळे काही वेळ रुग्णवाहिका रस्त्यावरच ठप्प उभी राहिली. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाढला. स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार, रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त नसतो. त्यामुळे वाहनधारकांना नेहमी नाहक त्रास सहन करावा लागतो.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत पार्किंग उभ्या असतात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यासोबतच वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होते. बाजूलाच तुळींज पोलीस ठाणे असून, वाहतूक पोलिसांची जबाबदारी असल्याचे कारण देत तेथे तुळींज पोलीस ठाण्याचा एकही पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवत नाही.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, पोलिसांनी रात्रीच्या वेळी देखील योग्य बंदोबस्त ठेवावा आणि रुग्णवाहिकांना तातडीने मार्ग मिळेल, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीची पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed