Akola Accident News : अकोला एमआयडीसी परिसरात बिअर घेऊन जाणारी गाडी पलटल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चालकाला मदत करण्याऐवजी लोकांनी अक्षरशः बिअरच्या बाटल्या लुटण्यासाठी झुंबड उडवली. काही तळीरामांनी तर रस्त्यावरच मद्यपान सुरू केले, ज्यामुळे माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली, परंतु तोपर्यंत गाडीतील बरीच बिअर गायब झाली होती.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी सचिन हुंडीवले यांनी ‘मटा ऑनलाईन’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी घटनेची माहिती दिली. “अपघाताची घटना ही संध्याकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली. मला माहिती पडलं की, इथे ट्रकचा अपघात झालाय. मी इथे आलो तेव्हा पाहिलं की, बिअर आणि वाईनचा ट्रक पलटी झाला होता. मी येऊन पाहताच ड्रायव्हर आणि इतर एकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मी माझे जेवढे वाचवण्याचे प्रयत्न होतात तेवढे प्रयत्न केले”, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
‘यानंतर गर्दी तुटून पडली अन्’
“मी वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ड्रायव्हर अपघातग्रस्त गाडीतून बाहेर पडला. या अपघातात ड्रायव्हर आणि गाडीतील आणखी एकाला जास्त दुखापत झाली नाही. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही”, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
“यानंतर गर्दी तुटून पडली. मला वाटलं की, वाहनचालकाला वाचवण्यासाठी लोकं आले. पण तसं झालं नाही. तुंबळ गर्दी ही रस्त्यावर पडलेल्या बिअर आणि वाईनचे बॉक्स घेऊन जाण्यासाठी आले. मी असे लोकं आजपर्यंत पाहिले नाहीत. कुणी विचारलंही नाही की, ड्रायव्हर जिवंत आहे का? गर्दीतली माणसं बिअरचे खोके घेऊन पळत होती”, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी सचिन हुंडीवले यांनी दिली.

