• Tue. Mar 10th, 2026

    Pune Crime : ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती अन् आरोपी गजाआड

    Pune Crime : ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती अन् आरोपी गजाआड

    Pune Crime News : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे धमकी देणारा आरोपी हा ससून रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता, असा देखील खुलासा पोलीस तपासात झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे : पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. ससून हॉस्पिटलमध्ये काम करत असणाऱ्या एका डॉक्टरच्या मोबाईलवर हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मेसेजद्वारे आले. यामुळे एकच खळबळ उडाली. या धमकीची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या धमकीची गंभीरपणे दखल घेतली. गेल्या काही दिवसांमध्ये भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे या धमकीकडे जास्त गांभीर्याने घेण्यात आलं. पोलिसांनी ससून रुग्णालयाचा संपूर्ण परिसर चेक केला. ससून रुग्णालयाचा एकही कोपरा पोलिसांनी सोडला नाही. पण कुठेच काही संशयास्पद आढळलं नाही. त्यामुळे कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला. पण या धमकीला गंभीरतेने घेत पोलिसांनी धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

    या प्रकरणात पुण्याच्या बंडगार्डन पोलिसांनी सखोल तपास केला. पोलीस आणि रुग्णालय प्रशासन तणावात होते. या धमकीचा अर्थ नेमका काय घ्यायचा? असा प्रश्न त्यांना पडला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. या दरम्यान पोलिसांना खबऱ्यांच्या आधारे मोठी माहिती मिळाली. रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानेच ही धमकी दिल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. यानंतर पोलिसांनी थेट त्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या.

    चोरलेल्या मोबाईलमधून धमकी दिली

    पोलिसांनी 29 वर्षीय आरोपी अरविंद कृष्णा कोकणी याला अटक केली. त्याला येरवडा परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. आरोपी सुरुवातीला आपला गुन्हा कबूल करत नव्हता. पण पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. यावेळी त्याने नेमका कोणाच्या मोबाईलमधून धमकी दिली ती देखील माहिती पोलिसांनी दिली.

    आरोपीने धमकी देण्यासाठी ससून रुग्णालयातील एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरला होता. त्याने त्या मोबाईलवरुन एका डॉक्टरला रुग्णालयात बॉम्ब असल्याची धमकी देणारा मेसेज केला. त्यानंतर त्याने मोबाईल बंद केला. दुसऱ्या दिवशी त्याने मोबाईल सुरु केला आणि थेट रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना धमकीचा मेसेज केला. त्यानंतर त्याने परत मोबाईल बंद केला. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याने असं नेमकं का केलं? याची चौकशी आता पोलीस करत आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed