Jalgaon Accident News Marathi News : जळगावात पिंप्री गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अमळनेर येथे परीक्षेसाठी गेलेल्या आपल्या मुलीला घेऊन परत येत असताना त्यांच्या कारला भरधाव वेगातील बोलेरो पिकअपने धडक दिली. मृतांमध्ये महेश सोनार यांचा समावेश असून, जखमींमध्ये त्यांची मुलगी आणि एक नातेवाईक आहेत.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश सोनार हे रामेश्वर कॉलनीत पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होते आणि पाण्याचे जार वाटपाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. आज अमळनेर येथे त्यांची मुलगी नैनाची एमबीएच-सीईटीची परीक्षा होती. त्यामुळे ते आपली मुलगी नैना आणि राजेश मिठूलाल धूत (वय ४६) यांच्यासोबत कारने अमळनेरला गेले होते. परीक्षा संपवून ते दोघे मुलीसह जळगावकडे परत येत असताना, दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिंप्री गावाजवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या एका बोलेरो पिकअप वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात महेश सोनार यांचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी नैना आणि सोबत असलेले राजेश धूत गंभीररित्या जखमी झाले.
Jalgaon News : फौजी होणं सोपं नाही गड्या! मुलीच्या वाढदिवसासाठी स्पेशल रजा, घरी येताच फोन वाजला अन् केक कापून जवान ४ तासात माघारी
याच रस्त्यावरून खासदार स्मिताताई वाघ हे अमळनेरकडे जात असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले. कारमधील सर्वजण जळगावातील रामेश्वर कॉलनीतील असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्या परिसरातील माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार मयतांच्या नातेवाईकांना अपघात झाल्याची माहिती देण्यात आले. जखमींना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे वातावरण अधिक शोकाकुल झाले होते.
दरम्यान, समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअपमध्ये लग्नाचे वऱ्हाड होते. आज सायंकाळी हळदीचा कार्यक्रम असल्याने वऱ्हाडी मंडळी त्या वाहनातून प्रवास करत होती. या अपघातात बोलेरोमधील काही जणही जखमी झाले असून, त्यांना नजीकच्या धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

