Devendra Fadnavis on Municipal Elections : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असला तरी निवडणुका घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये महायुती एकसंघपणे लढणार का? याबाबत खुलासा केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामहायुती एकत्र लढणार असल्याची घोषणा स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिेंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र पत्रकार परिषदेत बसले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये देखील तशी मोर्चेबांधणी सुरु आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी स्थानिक पातळीवर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहिजे तशी मैत्री दिसत नाही. त्यामुळे संबंधित ठिकाणी महायुतीचे घटकपक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण फडणवीसांनी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आणखी काय म्हणाले?
“आम्हाला अतिशय आनंद आहे की, सुप्रीम कोर्टाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आम्हाला परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की, निवडणूक आयोगाने तयारी करावी”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

