Gokul Milk Price Hike : महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत नाहीत. भाजीपाल्यासह दैनंदिन वापराच्या वस्तुंच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. यातच आता सर्वसामान्यांना आणखी एक महागाईचा धक्का बसणार आहे.
कोल्हापूर दूध उत्पादक संघाने पत्रक काढत दूध दरवाढ जाहीर केली आहे. कोल्हापूरातून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात वितरीत होणाऱ्या गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथीन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ होत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. नवे दर ४ मेपासून लागू होणार असल्याचेही संघाकडून सांगण्यात आले. मात्र टोण्ड(ताजा) व गोकुळ शक्तीच्या दुधाच्या किंमतीत कोणताही बदल होणार नाही.
Amul Milk Price Hike : महागाईचा भडका, अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले, गृहिणींचे बजेट बिघडणार
कसे असणार दुधाचे दर?
फुल क्रिम दूधाची (क्लासिक) किंमत ७४ रुपये प्रतीलीटर असणार आहे. तर फुल क्रिम दूध ५ लीटर किंमत ३६५ रुपये असणार आहे. तर गाय दूध (सात्विक) ची किंमतही आता ५८ रुपये लीटरवर पोहोचली आहे. यामुळे आता दूध उत्पादकांना याचा फायदा होणार असून ग्राहकांना मात्र जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
गोकुळ दुधाचा कोल्हापुरासोबतच मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात चांगला खप आहे. तर अमुल दुधाचाही खप लक्षणीय आहे. अमुलने दरवाढ करताच गोकुळ संघाने ही दरवाढ केली का? असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे असणार आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून दुधाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दर सहा महिन्यांनी दुधाचे दर वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. प्रतिलीटर दोन रुपये जरी वाढवले असले तरी सर्वसामान्यांच्या महिन्याचं बजेट मात्र कोलमडू शकतं. यामुळे दूधाच्या दरावर नियंत्रण आणावं, अशी मागणी सातत्याने केली जाते. यावर काही तोडगा निघतो का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

