• Sun. Mar 15th, 2026

    Gulabrao Patil : ‘निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक’, मंत्री गुलाबराव पाटील यांचा गुलाबराव देवकर यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट

    Gulabrao Patil : ‘निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक’, मंत्री गुलाबराव पाटील यांचा गुलाबराव देवकर यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट

    Gulabrao Patil Slams Gulabrao Deokar : माजी मंत्री गुलाबराव देवकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी देवकर यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणुकीआधी देवकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्यासोबत बैठक झाली होती, असा गौप्यस्फोट पाटलांनी केला. देवकर यांच्यावर अनेक आरोप आहेत, ते ते लपवण्यासाठीच प्रवेश करत आहेत, असेही पाटील म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या वृत्तावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीआधी गुलाबराव देवकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्यासोबत बैठक झाली होती, असा मोठा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर आता देवकर आप्पांकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. विधानसभा निवडणुकीवेळीदेखील ते एकमेकांच्या विरोधात होते. पाटील हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. तर गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते. दोघांमधील निवडणूक प्रचंड चुरशीची ठरली. पण अखेर गुलाबराव पाटील यांचा विजय झाला. निवडणुकीच्या सहा महिन्यांनंतर आता देवकर आप्पा ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपण चुकीच्या व्यक्तीचा प्रवेश केला, अशी अजित पवार यांना नंतर जाणीव होईल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

    ‘त्यांचे लफडे बंद होणार नाहीत’

    “गुलाबराव देवकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला म्हणून त्यांचे लफडे बंद होतील, असं नाहीय. ते टायर एसीमधून टू टायर एसीमध्ये जात आहेत. ते कशाकरता जात आहेत ते अख्ख्या जगाला माहिती आहे. मजूर फेडरेशनचे असलेले लफडे, 27 लाख रुपये दवाखान्याचं बेकायदेशीर भाडे घेत आहेत, त्यांनी आतापर्यंत शासनाकडून 8 कोटी रुपये भाडे घेतलं आहे. ते भाडं चालू राहावं याकरता ते जात आहेत”, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

    “गुलाबराव देवकर यांनी निवडणुकीवेळी 10 कोटी रुपये विथड्रॉ केलेली आहे. याबाबत मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते अडचणीत आहेत”, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

    ‘घाण साफ करण्यासाठी ते जात आहेत’

    “जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक असताना त्यांनी स्वत: 10 कोटी रुपये कर्ज घेतलं आहे. कायद्याने ते घेता येत नाही. ज्या दिवशी ते कर्ज घेतात त्याचदिवशी त्याचं सभासत्व गेलं पाहिजे. ते त्यांना लपवायचं आहे. गुलाबराव पतसंस्था या नावावर त्यांनी 10 कोटी रुपये काढलेले आहेत. ते अजूनपर्यंत भरलेले नाही. त्याची उच्च न्यायालयात केस चालली आहे. त्यासाठी 24 तारीख आहे. त्यामध्येही काही प्रोब्लेम होऊ शकतात. त्यांनी ही सर्व जी घाण केलेली आहे, ती घाण साफ करण्यासाठी ते जात आहेत”, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

    ‘अजित पवारांनी फार सुंदर माणसं तपासली’

    “अजित दादा छातीठोकपणे सांगतात की, मी माणसं तपासून घेईन. त्यांनी फार सुंदर माणसं तपासली आहेत. देवकर आप्पासारखी माणसं तपासली आहेत. त्यांना पुढच्या काळात लक्षात येईल की, आपण तपासलेला माणूस हा चुकीचा होता”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

    गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट

    “कारवाई काय रस्त्यावर पडलेली नाही. आता सहा महिने तोंड का बंद होतं? एकनाथ शिंदे यांना भेटायच्या वेळी कुठे झोपले होते? निवडणुकीच्याआधी त्यांची माझ्याबरोबर आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली”, असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील यांनी केला. “हे कुणाचे लॉयल नाहीयत. त्यांना त्यांची घाण दाबायची आहे”, अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

    निलेश पाटील

    लेखकाबद्दलनिलेश पाटीलमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये जळगाव ‘जिल्हा प्रतिनिधी’ म्हणून कार्यरत. गेल्या 12 वर्षापापूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात. तरुण भारत, सकाळ, लाईव्ह ट्रेण्ड न्यूजमधून प्रवास करीत मटा ऑनलाइनपर्यंत प्रवास.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed