KDMC News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मुरबाड रोडवरील अस्तित्वात नसलेल्या दुभाजकांना रंगवण्याचे बिल ठेकेदाराला दिल्याने मनसे आक्रमक झाली आहे. माहितीच्या अधिकारात हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मिस्टर इंडियाचा चष्मा लावून, हातात ब्रश घेत केडीएमसीच्या भ्रष्टाचाराचा निषेध केला. भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई न झाल्यास मनसे अधिकाऱ्यांना ठोकणार, असा इशारा मनसे नेते उल्हास भोईर यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय. कल्याण स्टेशन ते गुरुदेव चौकासह, संतोषी माता रोड आणि काही ठीकाणचे फुटपाथ डिव्हायडर रंगवणे आणि धुण्याचे तब्बल 40 लाखांचे बिल दिलं. कल्याण डोंबिवली महापालिकेने हे कंत्राट काढल्याचा आरोप मनसेने केलाय. माहितीच्या अधिकारात मनसे कार्यकर्त्यांनी ही माहिती उघड केली.
आंदोलकांच्या डोळ्यांवर मिस्टर इंडियाचे लाल रंगाचे प्रतिकात्मक चष्मे
केडीएमसी महापालिकेच्या कारभाराविरोधात आज मनसेने प्रतिकात्मक आंदोलन केलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मिस्टर इंडियाचे लाल रंगाचे प्रतिकात्मक चष्मे घातले होते. तसेच हातात बादल्या आणि रंगाचा ब्रश घेऊन प्रतिकात्मक फूटपाथ डिव्हायडर रंगवत केडीएमसी आणि केडीएमसी अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी कल्याण स्टेशन ते गुरुदेव चौकापर्यंत डिव्हायडरच नाही तर मग हे डिव्हायडर रंगवण्याचे धुण्याचे बिल काढले कसे? असा सवाल केला.
Kalyan News : केडीएमसीने नसलेले डिव्हायडर रंगवले, लाखोंचे बिल काढले, मनसेचा गंभीर आरोप
तसेच इतर ठिकाणच्या देखील फुटपाथ आणि डिव्हायडर रंगवण्याचे काम एमसीएचआय या बिल्डराच्या संघटनेला दिले आहे, तो खर्च ती संघटना करणार आहे. त्याचा महापालिकेचा बिलाशी काही संबंध नाही मग त्यांचे बिल देखील केडीएमसीने काढले कसे? असा सवाल उपस्थिती केला. महापालिका अधिकारी स्वतःची तिजोरी स्वतःच भरतायत. केडीएमसी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई केली नाही तर मनसे अशा अधिकाऱ्यांना ठोकणार असा इशारा आंदोलकांनी दिला.
