Navi Mumbai Drug Case: सचिन भालेराव आणि संजय फुलकर अशी अटक झालेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. फुलकर हा नवी मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी कक्षामध्ये, तर भालेराव हा खारघर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.
हायलाइट्स:
- बिल्डर चिंचकर यांच्या मुलासोबत संबंध उघड
- व्हॉट्सअॅप चॅटमधून धक्कादायक पुरावे समोर
- आणखी काही पोलिसांची चौकशी सुरू
सचिन भालेराव आणि संजय फुलकर अशी अटक झालेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. फुलकर हा नवी मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी कक्षामध्ये, तर भालेराव हा खारघर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. याप्रकरणी आणखी काही पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. पाच दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक चिंचकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. चिंचकर यांच्या दोन्ही मुलांचा अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीत सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले होते. गेल्या महिन्यात नवी मुंबईत दाखल झालेल्या एका गुन्ह्यात चिंचकर यांचा दुसरा मुलगा धीरज याचा सहभाग आढळून आला होता.
शुभमंगल ‘सावधान’! लग्नसोहळ्यातील जेवणातून विषबाधा; २८९ वऱ्हाडींची प्रकृती बिघडली, एका चिमुकल्याचा मृत्यू
याच प्रकरणात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला धीरजसोबत फुलकर व भालेराव यांचा थेट संबंध असल्याचे समजले होते. त्यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटवरून याचे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतला व गुन्हे शाखेने रविवारी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा या दोघांना अटक करण्यात आली. तर अन्य पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांकडून गुप्तता राखण्यात येत असून, या गुन्ह्यात आणखी काही अधिकारीही गुंतले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लाकूड, कोळसा नकोच! बेकऱ्या, रेस्टॉरंट, भट्ट्यांमध्ये ९ जुलैनंतर वापर न करण्याचे ‘एमपीसीबी’चे निर्देश
नवी मुंबईतील कारवाया सन २०२३ या वर्षात अमली पदार्थविरोधी कारवाईत ३५३ आरोपींना अटक करून २१ कोटी १३ लाख रु.चे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तर नोव्हेंबर, २०२४मध्ये तळोजात केलेल्या कारवाईत दोन नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेऊन पाच कोटी ६२ लाख रुपयांचे मेफेड्रोन व कोकेन जप्त करण्यात आले होते. याशिवाय २९ मार्च रोजी वाशीमधील छाप्यात आफ्रिकेच्या देशांतील १४ नागरिकांची धरपकड केली होती. विशेष म्हणजे या १४ जणांच्या व्हिसा आणि पासपोर्टची मुदत देखील संपल्याचे पोलिसांना आढळून आले होते.

