Ghansoli Nala: घणसोली परिसरातील वस्तीला लागून असलेल्या नाल्यातील पाण्याचा रंग हा गडद जांभळ्या रंगाचा झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून काही रहिवाशांना मळमळ, डोकेदुखी तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळातच हा प्रकार घडल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नाले शहरातून पुढे खाडीकडे
घणसोली गावाच्या वेशीपासून सुरू होणारा हा नाला पुढे घणसोली सेक्टरमधून खाडीकडे जातो. या नाल्यालगत मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांमधून निघणारे नाले शहरातून पुढे खाडीकडे जात असल्याने त्यात रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
काही प्रमाणात त्रास सुरू
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने हा त्रास काही प्रमाणात कमी जाणवतो. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नाल्यातील दुर्गंधी आणि प्रदूषणाचा त्रास अधिक तीव्र होतो, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
नाल्याच्या दुर्गंधी वाढली
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने घणसोली परिसरात नाल्याची दुर्गंधी वाढली होती. सोमवारी सकाळी नाल्यात गडद जांभळ्या रंगाचे पाणी वाहताना नागरिकांच्या निदर्शनास आले. पाण्याचा रंग आणि दुर्गंधी यामुळे परिसरात काही काळ अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले. दूषित पाण्याच्या संपर्कामुळे किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या वायूमुळे काही नागरिकांना मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याचे स्थानिकांनी सांगितले.
Mumbai High Court : सर्वात मोठी बातमी! सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी, मुंबई हायकोर्टाचे निर्देश
नाल्यातील पाण्याची तातडीने तपासणी करून त्यातील रासायनिक घटकांचा शोध घ्यावा, तसेच संबंधित उद्योगांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांची पाहणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी घणसोलीतील रहिवासी स्मिता देशमुख यांनी केली.
प्रक्रिया न करता सांडपाणी सोडल्याचा आरोप
एमआयडीसीतील रासायनिक उद्योगांनी सांडपाण्यावर आवश्यक प्रक्रिया केल्यानंतरच ते बाहेर सोडणे अपेक्षित आहे. मात्र, काही कंपन्यांकडून प्रक्रिया न करता रसायनमिश्रित पाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सोमवारी नाल्यात दिसलेल्या गडद जांभळ्या रंगाच्या पाण्यामुळे हा प्रकार गंभीर असल्याचे स्पष्ट होते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
