Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुरात भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून मतभेद समोर येताना दिसत आहेत. ‘फॉर्च्युनर आणि पैसे असतील तर भाजप अध्यक्ष होता येतं’ अशा आशयाचे बॅनर शहरात झळकल्याने खळबळ उडाली आहे. नियमांना डावलून निवड झाल्याचा दावा जुन्या कार्यकर्त्यांचा असून ते नाराज असल्याची चर्चा आहे. या प्रकरणावर वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. शुक्रवारी शिर्डीत होणाऱ्या बैठकीत कार्यकर्ते आपली भावना व्यक्त करण्याची शक्यता आहे.
भाजपच्या मंडल अध्यक्षांच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. या निवडी होताना भाजपचे मूळ कार्यकर्ते डावलले गेले असल्याची जोरदार चर्चा नगर जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. या निवडी करताना पक्षाने ४५ वयापेक्षा तो अधिक नसावा, सक्रिय सदस्य झालेला असावा, बूथ अनुभव असावा, पक्षाच्या विचारांना जपणारा असावा अशा नियम अटी ठेवल्या होत्या. मात्र अनेक मतदारसंघात नियमांना हरताळ फासला गेल्याची तीव्र भावना बघायला मिळते आहे.
काही तालुक्यांमध्ये काही दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या लोकांना थेट मंडल अध्यक्षाची पद मिळाल्याने वर्षानुवर्ष पक्ष रुजवण्यासाठी वाढवण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळले असल्याची चर्चा आहे. आपण तक्रार करूनही काहीच फरक पडत नाही. कारण पैशांच्या ताकदीवर धन दांडगे पक्षवेठीस धरत आहेत, अशी संतप्त भावना अनेक कार्यकर्त्यांची आहे. श्रीरामपूर तालुक्यात असाच उद्रेक एका फलकाच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे. पक्षाचे वरिष्ठ खाली होणाऱ्या या कारभाराकडे लक्ष देणार का? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
भाजप कार्याध्यक्षांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 25 एप्रिलला अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक शिर्डीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे देखील उपस्थित राहणार आहे. या बैठकीमध्ये नेमकी कार्यकर्ते आपली भावना व्यक्त करणार का? आणि त्यावरती कार्यकारी अध्यक्ष काय निर्णय घेणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार असून याकडे भाजपतील सर्वांचे लक्ष लागले आहे.

