• Fri. Sep 18th, 2026

परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 18, 2026

पुणे, दि. १८ : परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधत विकासाकडे वाटचाल करताना समृद्ध सांस्कृतिक वारसा, भाषा, कला, परंपरा आणि मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासासोबत सांस्कृतिक मुळांशी नाते दृढ ठेवणे ही विकसित भारताची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे पुणे फेस्टिव्हलच्या 38 व्या पर्वाचे उद्घाटन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार हेमा मालिनी, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मीरा सुरेश कलमाडी आदी उपस्थित होते.

यावेळी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांना ‘पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

पुण्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक योगदानाचा गौरव करतांना उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पुणे फेस्टिव्हलने कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य, क्रीडा आणि पर्यटन क्षेत्राला एकत्र आणत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध देशांतील कलाकार, पर्यटक, प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळते. यंदाच्या महोत्सवात 21 देशांतील विद्यार्थी सहभागी झाले हे विविध श्रद्धा, संस्कृती आणि परंपरांचा आदर ही भारताच्या सांस्कृतिक जीवनाची वैशिष्ट्ये असल्याचे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.

महिलांना कला, सर्जनशीलता आणि प्रतिभा सादर करण्यासाठी पुणे फेस्टिव्हलने व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून अशा उपक्रमांमुळे महिलांचा आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाला चालना मिळते. पुणे फेस्टिव्हलशी संबंधित महिला पदाधिकाऱ्यांचा उल्लेख करत त्यांनी वैयक्तिक दुःखावर मात करून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचे कौतुक केले.

विकासाचा अर्थ केवळ आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, आर्थिक वाढ किंवा सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढ एवढाच मर्यादित नसून संस्कृती, भाषा, परंपरा आणि कलांचे संवर्धनही त्याचा अविभाज्य भाग आहे. आधुनिक शहरे उभारताना त्यांचा सांस्कृतिक आत्मा जपणे, नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देतानाच परंपरेचा सन्मान करणे आणि विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

‘विकसित भारत’ ही संकल्पना सर्वसमावेशक, समताधिष्ठित आणि सांस्कृतिक वारशाच्या मुळांशी जोडलेली असावी. प्रत्येक प्रदेश, समाजघटक आणि नागरिकाला विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळावी. पुणे फेस्टिव्हलसारखे महोत्सव सांस्कृतिक वारसा जगासमोर मांडतानाच स्थानिक कलाकार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला संधी उपलब्ध करून देतात, असे श्री. राधाकृष्णन यांनी नमूद केले.

पुण्याच्या ऐतिहासिक आणि सामाजिक क्षेत्रातील तसेच स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा उल्लेख करून उपराष्ट्रपती म्हणाले,  पुणे हे देशातील महत्त्वाचे शिक्षणकेंद्र असून शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि ग्रंथालयांमधून ज्ञान-विचारांची देवाणघेवाण होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगसारख्या संस्थांसह उद्योग, माहिती तंत्रज्ञान, वाहननिर्मिती, पर्यटन आणि वास्तुकला क्षेत्रातील योगदानामुळे पुण्याने देशाच्या प्रगतीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. विविध क्षेत्रांतील प्रगतीसोबतच उत्सव आणि सांस्कृतिक वैविध्याची नगरी म्हणूनही पुण्याची ओळख निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. पुणे फेस्टिव्हलच्या सातत्यपूर्ण आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करत उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी संस्थापक अध्यक्ष दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या योगदानाचेही स्मरण केले.

सांस्कृतिक पर्यटनाला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील-राज्यपाल

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्राचा उत्सव’ म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली असून हा उत्सव साजरा करतांना पुणे फेस्टिव्हल विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करीत आहे. पर्यटन हे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे साधन असून महाराष्ट्रातील सांस्कृतिक पर्यटनाला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पुणे फेस्टिव्हलला भविष्यात आणखी विस्तार देऊन जागतिक सांस्कृतिक महोत्सव म्हणून विकसित करण्याची मोठी क्षमता असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.

पुणे हे महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात आणि सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान असलेले शहर आहे. महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ही कर्मभूमी असून सामाजिक समता आणि महिला शिक्षणाची चळवळ येथे बळकट झाली. पुणे हे ज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, उद्योग आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित झाले असून ‘सांस्कृतिक राजधानी’ आणि ‘उत्सवांचे शहर’ म्हणूनही त्याची ओळख निर्माण झाली आहे, असे श्री. वर्मा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा समर्पण अभियानांतर्गत’ महोत्सवाच्या काळात विविध सेवाभावी उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

पुणे  फेस्टिव्हलची समृद्ध परंपरा जपण्यासाठी सर्व सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री

पुणे फेस्टिव्हलच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख करून उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, गायन, वादन, नृत्य, शास्त्रीय संगीत, लोककला, नाट्य, साहित्य, क्रीडा आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील कलाकारांना या महोत्सवाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. मोठ्या कलाकारांसोबत नवोदित कलाकारांना संधी देणे, महिला महोत्सव, लावणी महोत्सव, चित्रकला, नृत्य, पाककला, मेहंदी तसेच विविध स्पर्धांचे आयोजन आणि आंतरराष्ट्रीय सहभाग हे पुणे फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुण्याची संस्कृती आता पुण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून जगाशी संवाद साधणारा हा महोत्सव सांस्कृतिक दुवा ठरत आहे, असे सांगून या महोत्सवासाठी शासनाच्या माध्यमातून सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. पुणे ही केवळ महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी नसून विचार, शिक्षण, साहित्य, संगीत, नाटक, कला, क्रीडा आणि सामाजिक चळवळींची समृद्ध परंपरा असलेले शहर आहे. त्यामुळे पुण्याच्या भूमीवर होणाऱ्या पुणे फेस्टिव्हलला विशेष महत्त्व आहे. हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून पुण्याची सांस्कृतिक ओळख, परंपरा आणि पुणेकरांच्या उत्साहाचा उत्सव आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुणे फेस्टिव्हलदेशाची सांस्कृतिक ओळख जगासमोर नेणारे महत्त्वाचे व्यासपीठ-आशिष शेलार

पुणे फेस्टिव्हलच्या 38 व्या पर्वाला शुभेच्छा देताना श्री. शेलार म्हणाले, गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय आणि देश-विदेशात त्याचे आयोजन हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षमतांचा विस्तार आहे. ‘वारसा ते विकास’ या संकल्पनेतून वारसा, परंपरा आणि विकास यांची सांगड घालण्यावर त्यांनी भर दिला. पुणे फेस्टिव्हल हे महाराष्ट्राची आणि देशाची सांस्कृतिक ओळख जगासमोर नेणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचेही श्री. शेलार यांनी नमूद केले.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जागतिक पातळीवर दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करतांना ते म्हणाले, महाराष्ट्राच्या विविध भागांतील भाषा, लोककला, नृत्य, पाककला आणि परंपरांमधील वैविध्य हे राज्याचे वैशिष्ट्य आहे. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून हे सांस्कृतिक वैभव सातत्याने जगासमोर येत आहे. पुणे फेस्टिवलच्या चेअरमन मीरा कलमाडी यांनी आपल्या प्रास्ताविकात पुणे फेस्टिवलच्या 38 वर्षांची वाटचाल विशद केली.

000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed