Masterplan of Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टरप्लॅन लवकरच जाहीर होणार असून, तो सर्वसमावेशक आणि हवामान बदलांना तोंड देणारा असेल. या प्रकल्पात हरित क्षेत्रावर विशेष भर दिला जाणार आहे, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. रहिवाशांना आरोग्य, क्रीडा आणि मनोरंजनाच्या सुविधा मिळतील, तसेच पुरेशी हिरवळ आणि चालण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध असतील. शाश्वत विकासाच्या दृष्टीने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा पथदर्शी ठरतानाच भविष्यवेधी ठरण्याच्या दृष्टीने मास्टर प्लॅनमध्ये नियोजन केले आहे. हा पुनर्विकास प्रकल्प निवासी क्षेत्र म्हणून विकसित करताना त्यात रहिवाशांना पुरेशा आरोग्य, क्रीडा, मनोरंजन-विरंगुळ्याच्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. मुंबईत पावसाळ्यात सखल भागात दरवर्षी पूर येतो, त्यात धारावीचाही समावेश असतो. ही बाब लक्षात घेताना मास्टरप्लॅनमध्ये त्याचा विचार केला आहे. धारावी अधिसूचित क्षेत्रात (डीएनए) विशेषरित्या आरेखन केलेल्या पाण्याचा वेगवान निचरा करणाऱ्या भागांसह महत्त्वाच्या ठिकाणी असणाऱ्या हरित क्षेत्रांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे ही हरित क्षेत्र हवामान बदलांसह, मान्सूनशी निगडित आव्हानांना सक्षमरित्या तोंड देण्यास सहाय्यभूत राहतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
शाश्वत विकासाकडे कल
धारावी पुनर्विकास प्रकल्पात कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. जगातील इतर शहरांप्रमाणेच या ठिकाणी चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल, असे पाहिले जाईल. त्यासोबत सायकलचा वापरही अधिक होण्यासाठी पूरक वातावरण राहील. संपूर्ण प्रकल्पात शाश्वत, हरित परिसर निर्माण करण्यासाठी अनुकूल वातावरण असेल. रहिवाशांना चालण्यासाठी मुबलक जागा, सायकल चालविणाऱ्यांसाठी सुरक्षित रस्ते, वाहनांचा वापर कमी होईल, अशा रितीने रचना असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
हरित क्षेत्र आणि सामाजिक बंधांसाठी उपयुक्त
प्रकल्पात घर किंवा नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणांपासून काही मिनिटांच्या अंतरावर हरित क्षेत्र, उद्याने उपलब्ध असतील. हरित क्षेत्रांची वानवा दूर कररून डीएनएमध्ये छोटी हरित क्षेत्र विकसित करण्यात येतील. या क्षेत्रांपर्यंत पोहोचण्यासाठी रहिवाशांना पाच मिनिटांपेक्षा अधिक चालावे लागणार नाही, हे पाहिले जाईल. आंतराष्ट्रीय स्तरावरील शहर नियोजनासाठी आधारभूत असणाऱ्या घटकांनुसार इथे सुविधा दिल्या जातील. मुंबईसह धारावीत हरित क्षेत्रांची कमतरता लक्षात घेता ही हरित क्षेत्र सामाजिक जडणघडणीसाठी पोषक ठरतील, अशी भूमिका त्यामागे आहे.