Trupti Desai on Walmik Karad : सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड याच्याबाबत मोठा दावा केला आहे. वाल्मिक कराड याला कोठडीतच मारलं जाऊ शकतं, असा खळबळजनक दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे.
तृप्ती देसाई यांच्या दाव्याआधी बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराड याच्याबाबत मोठा दावा केला. “वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर होती. कराडच्या एन्काउंटरसाठी आपल्याला 5, 10 आणि 15 कोटींची ऑफर होती”, असा दावा कासले यांनी केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या या दाव्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. “वाल्मिक कराडचे जवळचे लोकच त्याची सुपारी देऊ शकतात. वाल्मिक कराड कोठडीत मृत अवस्थेत आढळला अशी पोलीसच घोषणा करतील”, असं धक्कादायक वक्तव्य तृप्ती देसाई यांनी केलं आहे.
तृप्ती देसाई यांच्या वक्तव्याने खळबळ
“वाल्मिक कराडचा एन्काऊंटर किंवा खून होऊ शकतो. रणजीत कासले किती खरे बोलतायत किंवा खोटे ते माहीत नाही. पण वाल्मिक कराडच्या जवळचे लोक त्याला संपवण्यासाठी एन्काऊंटरची सुपारी देऊ शकतात”, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत. दरम्यान, वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे तृप्ती देसाई यांचा रोख नेमका कुणाच्या दिशेला होता? असा प्रश्न उपस्थित होतोय.
“वाल्मिक कराडचा खून होऊ शकतो याची भीती मी आधीही व्यक्त केली होती. वाल्मिक कराड मोठ्या मोहऱ्याचं नाव घेऊ शकतो. त्यामुळे अनेकांचे राजकीय करियर खराब होऊ शकतं, म्हणून त्याची जवळचीच टीम त्याचा एन्काऊंटर करण्याची सुपारी देऊ शकते”, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला.
“वाल्मिक कराडला स्लिप ऍब्निया नावाचा आजार आहे. या आजारामध्ये माणूस श्वास घ्यायचं विसरतो. त्यामुळे त्याचं मशीन काढून घेतलं जाऊ शकतं आणि कोठडीमध्ये तो मृत अवस्थेत आढळला अशा पद्धतीची घोषणा पोलीस करू शकतात. त्यामुळे वाल्मिक कराडला कधीही मारलं जाऊ शकतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जर गेम झाला तर ही केस पूर्ण संपवली जावू शकते. त्यामुळे वाल्मिक कराडचा एन्काऊंटर कधीही होऊ शकतो”, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.