Eknath Shinde And Ajit Pawar News : राज्यात महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांच्या भाषणानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणासाठी बोलावले नाही. यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. तर अजित पवार हे देखील कार्यक्रम संपताच निघून गेले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत चैत्यभूमीवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुती सरकारमधील विविध मंत्री आणि दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात एक धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंचावर आले. यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. नंतर राज्यपाल राधाकृष्णन यांनी भाषण केलं. यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाषणासाठी बोलावण्यात आलं नाही.
विशेष म्हणजे कार्यक्रमपत्रिकेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचं भाषण होईल, असा उल्लेख होता. त्यासाठी वेळ देखील ठरली होती. कार्यक्रम पत्रिकेनुसार, राज्यपालांच्या भाषणानंतर 10 वाजून 10 मिनिटांनी अजित पवार यांच्या भाषणासाठी वेळ ठरली होती. तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी 10 वाजून 15 मिनिटांची वेळ देण्यात आली होती. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणासाठी प्रत्येकी 5 मिनिटे देण्यात आली होती. पण दोन्ही नेत्यांना यावेळी भाषणातून वगळण्यात आलं.
भाषणासाठी आपलं नाव घेण्यात न आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी तुमचं नाव भाषणाच्या पत्रिकेत नव्हते असं म्हटलं. यावर एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमपत्रिकेचा दाखला दिला. पण संबंधित कार्यक्रम पत्रिकेत काल रात्रीच बदल करण्यात आली आणि नव्या कार्यक्रमपत्रिकेत केवळ राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचं नाव भाषणासाठी असल्याचं अधिकाऱ्यानं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. विशेष म्हणजे कार्यक्रमात भाषणासाठी तुमचं नाव नसल्याची कल्पना तुम्हाला दिली नव्हती का? असा उलटसवालच अधिकाऱ्याने शिंदेंना केला. यानंतर आता शिंदे यांच्याकडून कार्यक्रमपत्रिका बदलणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवार थेट निघून गेले. तर एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी येत पत्रकार परिषद घेतली.
एकनाथ शिंदे नाराजीच्या चर्चांवर काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेत पत्रकारांनी तुमची नाराजी आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. “अरे बाबा, चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं काय मोठं असू शकतं? त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला साजरी झाली. आम्ही सगळे गेलो. इथे साजरी झाली. वेगवेगळ्या ठिकाणी साजरी होत आहे. हजारो-लाखो ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते. याचा आनंद प्रत्येकाला आहे. तशी मलाही आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.