नागपूरजवळील समृद्धी महामार्गावरील अंडरपासच्या चेनलिंकमध्ये एक मादी बिबट्या अडकली होती. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तिला सुखरूप बाहेर काढले. वन्यजीवांच्या सुलभ हालचालीसाठी हे अंडरपास बनवले आहेत, परंतु शेतकऱ्यांनी शेतात वन्यजीव येऊ नये म्हणून याला चेनलिंक लावून बंद केले होते. त्यामुळे बिबट्या जखमी झाला.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे यांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सेमिनरी हिल्स येथील प्राणी बचाव केंद्राच्या पथकाला पाचारण केले. या चमूने तातडीने घटनास्थळी पोहोचून या बिबट्याला चेनलिंकमधून अर्ध्या तासात सोडविले. बिबट्याला किरकोळ जखमा झाला असल्याने उपचारासाठी प्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले आहे.
नागपूरचे उपवनसंरक्षक डॉ भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक मनोज धनविजय, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांच्यासह हरीश किनकर, प्रतीक घाटे, सानप, आंधळे, समीर नेवारे, डॉ राजेश फुलसुंगे, डॉ सिद्धांत मोरे, बंडू मंगर, खेमराज नेवारे, विलास मंगर, आशिष महाले यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी बंद केला अंडरपास
महामार्गांमुळे वन्यप्राण्यांच्या हालचालींवर मर्यादा येत असल्याची ओरड वारंवार होते. त्याकरिता अंडरपासची निर्मिती करण्यात येते. समृद्धी महामार्गावरही असे अंडरपास बनविण्यात आले आहेत. मात्र, झिरो पॉइंटजवळील अंडरपासला चेनलिंक करुन बंद करण्यात आले होते. ज्या शेताला लागून हा अंडरपास आहे तेथून वन्यजीवांना जाता येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी चेनलिंकने लावली होती. त्यामध्ये, पाय अडकून ही मादी बिबट जखमी झाली.