Ajit Pawar on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या अर्थ खात्याबाबत तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
याबाबतच्या वृत्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार रायगडच्या दौऱ्यानंतर साताऱ्याला रवाना झाले. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी ते साताऱ्याला गेले. या बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे अर्थ खात्याची तक्रार केली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
अजित पवार काय म्हणाले?
“मला अमित शाह असं काही बोलले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. मी अमित शाह यांच्यासोबत सकाळपासून ते त्यांचं विमान मुंबईसाठी टेकऑफ होत नाही तोपर्यंत होतो. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोबत होते”, असं अजित पवार म्हणाले.
“एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. काही असेल तर ते डायरेक्ट माझ्यासोबत बोलतील किंवा मुख्यमंत्र्यांसोबत बोलतील. आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या निर्णयांच्या संदर्भात एकत्र बसत असतो, चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो”, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत काय म्हणाले?
अजित पवार यांना यावेळी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत काही काळजी करु नका. सर्व व्यवस्थित चाललं आहे. यंदा डीपीटीसीचा प्लॅन देखील म्हणजे त्यांना जो काही निधी द्यायचा तो निधी आम्ही दिलेला आहे. त्यातून मार्ग निघेल. मार्ग निधाल्यानंतर लगेच तुम्हाला सांगितलं जाईल”, अशी प्रतिक्रिया दिली.