Mumbai 1 Card for Transport : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईकरांसाठी मोठी घोषणा केली. आता मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच स्मार्ट कार्ड ‘मुंबई १’ सुरू केले जाणार आहे.
रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव म्हणाले की, महाराष्ट्रात १.७३ लाख कोटींचे पायाभूत सुविधांचे काम हाती घेतले आहे. याशिवाय, यावर्षी २३ हजार ७७८ कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांना मंजुरी देखील देण्यात आली आहे. मुंबई लोकल ट्रेनसाठी २३८ नवीन वातानुकूलित ट्रेनलाही मान्यता देण्यात आली आहे. ज्याचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. मुंबईतील गुंतवणुकीबद्दल बोलताना वैष्णव म्हणाले की, एकट्या मुंबईत १७ हजरा कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. यामुळे शहराची रेल्वे व्यवस्था खूप आधुनिक स्वरुपाची असणार आहे.
‘मुंबई १’ कार्डचा किती सुलभ
रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले की, महाराष्ट्रातील रेल्वेच्या विकासासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. मुंबईतील लोकल ट्रेन सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. नवीन गाड्या आल्याने प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. फडणवीस म्हणाले की, ‘मुंबई १’ कार्डमुळे लोकांना वेगवेगळी तिकिटे खरेदी करण्याच्या त्रासापासून सुट्टी मिळेल.
फडणवीस असेही म्हणाले की, हे कार्ड सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीत उपयुक्त ठरणार आहे. एकाच कार्डने सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येईल. यामुळे वेळ वाचेल आणि प्रवासही सोपा होईल. त्यामुळे येणारे दिवस मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी खूप सोयीस्कर असणार आहेत. लोकांचे जीवनमान अधिक चांगले व्हावे, यासाठी सरकार सतत विकासकामांमध्ये गुंतलेले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, पूर्व महाराष्ट्रातील गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गाला देखील मंजुरी मिळाल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. या प्रकल्पामुळे विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणा यांच्यातील संपर्क सुधारणार आहे. यामध्ये केंद्र सरकार ४ हजार १९ कोटी रुपये योगदान देणार आहे. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करण्याची घोषणाही केली, या ट्रेनमुळे प्रवाशांना मराठा राजाशी संबंधित ऐतिहासिक ठिकाणे आणि किल्ले भेट देता येतील. परिणामी पर्यटनाला चालना मिळणार आहे.

