Nanded Politics : महायुतीमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नांदेडमध्ये भाजप नेते एकनाथ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात वाकयुद्ध रंगलेलं बघायला मिळत आहे.
एकनाथ पवार काय म्हणाले?
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना सुद्धा भाजपमध्ये येण्यास कुणीही रोखू शकत नाही. ते इतर कार्यकर्त्यांना सुद्धा राष्ट्रवादीत घेण्याचं काम करत आहेत, त्यांनी मुलीला आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश द्यावा. म्हणजे लोकांनाही समजेल, एक कुटुंब एखादा पक्ष घेऊन काम करतोय. पण एक कुटुंबातील माणूस दुसऱ्या पक्षात ठेवायचा. तर दुसऱ्या कुटुंबातील माणूस दुसऱ्या पक्षात ठेवायचा. अशाप्रकारची दुटप्पी भूमिका चिखलीकर परिवाराने घेऊ नये”, अशी टीका एकनाथ पवार यांनी केली.
“मुलाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊन जायचं आणि मुलीला भाजपात ठेवायचं, म्हणजे सत्तेची फळं दोन्ही ठिकाणी मिळवायची. त्यांची उपजिविका राजकारणावर आहे. राष्ट्रवादीमधील अनेक कार्यकर्ते देखील चिखलीीकरांच्या हुकूमशाही आणि एकाधिकारशाहीला कंटाळले आहेत. त्यांनी असंच केलं तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भाजपात येण्यासाठी कोणी रोखू शकत नाही याचा त्यांनी विचार केला पाहिजे”, असं एकनाथ पवार म्हणाले. त्यांच्या टीकेला प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रत्युत्तर दिलं.
चिखलीकर यांचं प्रत्युत्तर काय?
“कोण आणि काय टीप्पणी केली ते मला माहिती नाही. मला काही फरकही पडत नाही. भाजपचं असं कुणी बोलत असेल आणि त्यांचं भाजपात थोडंफार वजन असेल तर त्यांनी माझ्या मुलीला पक्षातून काढायचं काम करावं. आपल्याला कुणी कुत्र विचारत नाही आणि इथे फडफड करत बसायचं त्याला अर्थ नाही. इथे बोलण्यापेक्षा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करावी. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पटवून द्यावं की, वडील एका पक्षात मुलगी दुसऱ्या पक्षात आहे. त्या देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन भाजप पक्षात आहेत”, असं प्रत्युत्तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिलं.
प्रणिता देवरे चिखलीकर काय म्हणाल्या?
“कुठल्याही गोष्टीची टीका करण्याची लेव्हल असते. नव्याने भाजपात येऊन तुम्ही भाजपच्या जुन्या लोकांना काढून टाका म्हणता. मग पक्ष कसा वाढेल. याला कलह नाही. तर संक्रमण काळ आपण म्हणून शकतो. कारण नव्याने भाजपात आलेल्या लोकांना अजून भाजप कळलेली नाही”, अशी प्रतिक्रिया प्रणिता देवरे चिखलीकर यांनी दिली.

