मुंबई, दि. ९ : पारनेर येथील वन विभागाच्या परिसरात व्यापक वनीकरण करण्याबरोबरच पर्यटन केंद्र विकसित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
पारनेर येथील वन विभागामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत वनमंत्री श्री. नाईक बोलत होते. यावेळी आमदार काशिनाथ दाते यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वनमंत्री श्री. नाईक म्हणाले की, वन विभागाच्या यशस्वी वाटचालीसाठी तसेच भविष्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध कार्यवाही करावी. परिसरात वनीकरण करताना गुलाब, झेंडू, बकुळ, प्राजक्त, रुद्राक्ष, सोनचाफा यांसह विविध सुगंधी आणि फुलझाडांची लागवड करावी. पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच अन्य शासकीय कार्यालयांच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे.
वन विभाग अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पारनेर परिसरातील खडकाळ भूभागाचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने तेथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही वनमंत्री श्री. नाईक यांनी दिल्या.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ