• Mon. Apr 14th, 2025 2:01:28 AM
    मतांची लाचारी, पाय चाटायचे म्हणून वक्फ सुधारणा बिलाचा विरोध, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

    Devendra Fadnavis: सध्या संसदेत वक्फ बोर्ड विधेयकावर चर्चा सुरु आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली असून बिलाचं स्वागत करतो असं सांगितलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात आलं असून त्यावर चर्चा सुरु आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केला असून यामुळे जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळाली असल्याचं म्हटलं आहे.मला अतिशय आनंद आहे की वक्फ सुधारणा बोर्ड बिल लोकसभेत मांडण्यात आलं असून त्यावर चर्चा सुरु आहे, मला विश्वास आहे की ते पास होईल. खरं म्हटलं तर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत जो सेक्युलर शब्द वापरण्यात आला आहे, त्याचं प्रत्यंतर आपल्याला या बिलमध्ये पाहायला मिळतं. ओरिजीनल बिल जे तयार झालं होतं, या ओरिजीनल कायद्यात अमर्याद अधिकार होते आणि चुकीच्या पद्धतीने जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्याविरोधात न्यायालयात जाण्याचीही मुभा नव्हती. नवीन बिलाने ती मुभा दिली आहे. चुका सुधारण्याची संधी दिली आहे’, असं फडणवीस म्हणाले.

    विशेष म्हणजे वक्फ बोर्डात महिलांना प्रतिनिधित्व मिळालं आहे. तीन तलाकनंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व मिळतंय हे अतिशय पुरोगामी असं पाऊल आहे. कुठल्याही समाजाच्या विरोधात हे नाही, धार्मिक आस्थेविरोधात हे नाही. तर पूर्वी झालेल्या चुका आहे, ज्याचा फायदा काही लोक घेत होते, मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते त्यांच्यावर यामुळे टाच येणार आहे. त्यामुळे मी या बिलाचं स्वागत करतो. मला विश्वास आहे ज्यांची ज्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत आहे, ते सगळे या बिलाचं समर्थन करतील.

    बोर्डाची जमीन उद्योगपतींच्या घशात घालायची, यासाठी बिलात सुधारणा करण्यात येत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, विरोधक यासंदर्भातला एकही पुरावा किंवा मुद्दा हा जॉइंट सिलेक्ट कमिटीपुढे आणू शकले नाही. कमिटीपुढे ते निरुत्तर झाले. २५ राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या होत्या त्यावर विचार करुन या सुधारणा करण्यात आल्या आहेत. जेव्हा काही उरत नाही तेव्हा अशाप्रकारच्या गोष्टी मांडल्या जातात. विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून निर्णय केला तर ते या बिलाच्या बाजुनेच निर्णय करतील. पण, त्यांना फक्त लांगूलचालन, केवळ मतांची लाचारी आहे त्यामुळे पाय चाटायचे आहेत म्हणून ते या बिलाचा विरोध करत आहेत.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed