Pune Crime News: होणारा नवरा पसंत नाहीये, त्याच्यासोबत लग्न करायचं नाही म्हणून एका तरुणीने चक्क त्याला संपवण्यासाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे तर तरुणी सध्या फरार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडेचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्यासोबत होणार होता. मात्र, मयुरीला सागरसोबत लग्न करायचं नसल्याने त्याला जीवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात समोर आलाय.
Bengaluru Wife Murder: थोबाडीत मारलं, तोंड दाबलं अन् मग… राकेशने गौरीला सुटकेसमध्ये भरलं तेव्हा ती जिवंत होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर जयसिंग कदम याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती. कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील असणारा सागर कदम हा हॉटेल कुक म्हणून काम करतो. २७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटा नजीक यवत पोलिसांच्या हद्दीत एका हॉटेलच्या परिसरात सागर कदम याला काही जणांनी रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती. यानंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता यातील संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी यवत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून आरोपींनी वापरलेली वेरणा कंपनीची पांढऱ्या रंगाची चार चाकी कार देखील ताब्यात घेतली आहे.
मयुरी दांगडेला सागर कदम सोबत लग्न करायचे नव्हते, म्हणून तिने १ लाख ५० हजार रुपयांची सुपारी देऊन ही घटना घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत.

