Gudipadwa 2025: सोन्याचा दर गेल्या तीन महिन्यांमध्ये २० टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, दरवाढीनंतरही मराठी माणूस मुहूर्ताची सोनेखरेदी चुकवणार नाही, असा अंदाज सोनेव्यापारी वर्तवत आहेत.
हायलाइट्स:
- सराफा बाजारात उलाढाल वाढण्याचा व्यापाऱ्यांना विश्वास
- छोट्या खरेदीकडे ग्राहकांचा कल राहण्याचा अंदाज
- सोन्याची नाणी अधिक विकली जाण्याची शक्यता
सोन्याच्या बाजारामध्ये घडामोडी घडतील. पण हे सारे सोनेविक्रीच्या वजनाच्या संख्यात्मक चित्रातही परावर्तित होईल का, याकडे सराफा बाजाराचे लक्ष लागले आहे. जागतिक पातळीवर सोन्याला आजही मागणी आहे. नवीन कमावती पिढी या सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहायला शिकली आहे. सोने खरेदीवर गुंतवणूक म्हणून विश्वास न ठेवण्याचा एक प्रघात काही काळापूर्वी सुरू झाला. मात्र, जगातील अस्थिर परिस्थितीने आणि सोन्याच्या चढत्या भावाने, करोना काळात सोन्याने अनेकांना दिलेल्या आधारामुळे नवी पिढीही पुन्हा सोन्याकडे वळत असल्याचेही सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या पिढीला दागिन्यांमध्ये फारसा रस नाही. गृहिणींचाही दागिने खरेदीकडील कल कमी झाला आहे. सध्या मोठे दागिने फारसे खरेदी केले जात नसून, हे त्याऐवजी हलक्या दागिन्यांकडे लोक वळले आहेत.
‘गेल्या तीन महिन्यांमध्ये सोन्याचे भाव वाढत गेले आहेत. करयुद्धापासून हा परिणाम अधिक झाला. मात्र, लोकांचा सोन्यावरील विश्वास कायम राहील आणि खरेदी वाढेल, असा विश्वास पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केला.

