Mumbai News : दर्शित राजूभाई सेठ एक पदवीधर होता. आणि चार महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक कोळी रहिवाशांनी मृतदेह पुलाखाली तरंगताना पाहिला आणि त्याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिस आणि अग्निशमन दलाने दर्शितचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी कोस्टल रोडवरील वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणाऱ्या बो स्ट्रिंग आर्च ब्रिजवर ही घटना घडली. मुंबई मालाड येथे वास्तव्यास असलेला ३० वर्षीय दर्शित राजूभाई शेठ वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. मंगळवारी कामावरुन सुटल्यानंतर त्याने त्याची गाडी वांद्रे-वरळी सी लिंकच्या दिशेने नेत आर्च ब्रिजजवळ पार्क केली. एका ट्रॅफिक अधिकाऱ्याने त्याची पार्किंग लाईट चालू असलेली गाडी पाहिली आणि ते अधिकारी त्याच्याकडे विचारणा करण्यासाठी जाणार त्यापूर्वीच, दर्शितने समुद्रात उडी मारली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने पुलाच्या जवळ तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती देऊन सतर्क केले. घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दल आणि नौदलाच्या मदतीने तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. संध्याकाळपासून रात्र होईपर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली. परंतु अंधार पडल्याने आणि प्रकाशाचा अभाव असल्याने मृतदेह सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक कोळी रहिवाशांनी मृतदेह पुलाखाली तरंगताना पाहिला आणि त्याबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिस आणि अग्निशमन दलाने दर्शितचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवला.
मृतदेह मिळाल्यानंतर त्याच्या मोबाईल फोनद्वारे पोलिसांनी दर्शितच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. दर्शित राजूभाई सेठ एक पदवीधर होता. आणि चार महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, गेल्याच वर्षी रस्त्याचे उद्घाटन झाल्यानंतर पुलावर आत्महत्येची ही पहिलीच घटना आहे.