महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुढच्या दोन दिवसांत अभूतपूर्व हालचाली घडणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आता चांगलेच कामाला लागले आहेत.
आगामी काळात राज्यात अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आणि कार्यकर्त्यांना उभारी देणं हे काँग्रेसपुढे मोठं आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अपेक्षेपेक्षा फार विरुद्ध लागलेला आहे. त्यामुळे पक्ष संघटनेला आता पुन्हा उभं करण्याचं आव्हान महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नव्या नेतृत्वाकडे असणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना यात यश येतं का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण सोमवार आणि मंगळवारच्या बैठका या महत्त्वाच्या आहेत.
बैठकीत नेमकी चर्चा काय होणार?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटना बांधणीला सर्वप्रथम प्राधान्य दिलं आहे. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बनताच आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक उद्या सोमवारी २४ फेब्रुवारी २०२५ ला दुपारी १.३० वाजता तर मंगळवारी २५ फेब्रुवारीला देखील दुपारीला १.३० वाजता बोलावण्यात आली आहे. या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाराऱ्यांशी चर्चा करणार आहेत.‘आमच्यात कुठलीही नाराजी नाही, पण एकनाथ शिंदे मला हलक्यात घेऊ नका हे कुणाला म्हणाले?’ अजित पवार यांचा सवाल
बैठकीला कोण-कोण उपस्थित राहणार?
या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष तथा काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, मुझफ्फर हुसेन यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप आणि कुणाल चौधरी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड गणेश पाटील यांनी दिली आहे.