• Wed. Mar 18th, 2026

    ‘भेट घेतली तरी हेतू एकच’, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

    ‘भेट घेतली तरी हेतू एकच’, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

    सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भेट घेतली तरी हेतू एकच आहे. कुठल्याही परिस्थितीत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. हा हेतू घेऊन ते काम करत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : भाजप आमदार सुरेश धस आणि अन्न-नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाल्याची माहिती समोर आल्यापासून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. सुरेश धस हे बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. सुरेश धस सातत्याने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बोलत आहेत. असं असताना त्यांनी अचानक धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमुळे विरोधकांकडून सुरेश धस यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. मराठा नेत मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही सुरेश धस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यानंतर आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    “कोण कुणाला भेटलं यावरुन अशाप्रकारे राजकारण होत असेल तर लोकशाहीत ते योग्य नाही. लोकशाहीत संवाद हा सुरु राहायला पाहिजे. सुरेश धस यांनी या प्रकरणात जी खंबीर भूमिका घेतली आहे ती सर्वांनी पाहिली आहे. पण ही खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवाद तोडून टाकायचा अशा प्रकारचं करायची आवश्यकता नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    “शेवटी धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत. एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्याने कुठलाही फरक पडत नाही. शेवटी सुरेश धस यांनीदेखील सांगितलं आहे की, भेट घेतली तरी हेतू एकच आहे. कुठल्याही परिस्थितीत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. हा हेतू घेऊन ते काम करत आहेत. आता काही लोकांना ते पुढाकार का घेत आहेत यामुळे पोटात दुखत आहे त्यामुळे ते टीका करत आहेत”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
    मोठी बातमी! मुंबईत कोळसा तंदूर भट्टींवर बंदी, नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा

    धनंजय मुंडे राजीनामा देणार?

    दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन विरोधकांकडून सातत्याने टीका होत असल्याने आता धनंजय मुंडे राजीनामा देतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तवव्य केलं आहे. “सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता. त्यामुळे राजीनामा द्यायचं की नाही हे धनंजय मुंडे यांनी ठरवावं”, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *