Electricity Generated From Waves: देशात पहिल्यांदाच समुद्राच्या लाटांवर वीज तयार होणार आहे. केंद्र सरकारी भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडने (बीपीसीएल) यासाठी पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत इस्रालयमधील कंपनीच्या सहकार्याने पहिला पायलट प्रकल्प मुंबईत उभा होणार आहे.
हायलाइट्स:
- मुंबईत १०० किलोवॉटचा पायलट प्रकल्प
- ‘भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड’चा पुढाकार
- इस्रायलच्या कंपनीसोबत आज सामंजस्य कराराची शक्यता
याअंतर्गत ‘बीपीसीएल’ लवकरच इस्रायलच्या ‘इको वेव्ह पॉवर’ या कंपनीशी सामंजस्य करार करणार आहे. त्या माध्यमातून समुद्राच्या लाटांपासून १०० किलोवॉट वीज तयार करणारा पायलट प्रकल्प मुंबईच्या समुद्रकिनारी उभा होणार आहे. ‘इको वेव्ह पॉवर’ ही या क्षेत्रात असा प्रकल्प यशस्वीपणे सिद्ध केलेली कंपनी आहे. त्यामुळेच हा सामंजस्य करार महत्त्वाचा असून ‘इंडिया एनर्जी वीक’मध्येच आज, अखेरच्या दिवशी हा करार होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
इस्रालयच्या तेल अवीव येथे मुख्यालय असलेल्या ‘इको वेव्ह पॉवर’ने इस्रायलसह जिब्राल्टर व पोर्तुगालमध्ये तब्बल पाच ते २० मेगावॉट क्षमतेचे लाटांवर आधारित वीजप्रकल्प यशस्वीपणे सुरू केले आहेत. त्यांच्या याच तंत्रज्ञानाद्वारे मुंबईतील पायलट प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत ‘बीपीसीएल’च्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

